दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समन्वय साधून काम करावे - आ. दीपकराव चव्हाण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० : फलटण तालुक्यातील संभाव्य चारा व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी समन्वय साधून काम करावे व तातडीने चारा व पाणी टंचाईचे आराखडे तयार करून चारा डेपोची मागणी करावी. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आम जनतेला दिलासादायक काम करावे अशा सूचना आमदार दीपकराव चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
फलटण तालुक्यातील संभाव्य टंचाईचा आढावा घेण्यासाठी फलटण पंचायत समिती येथे घेण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत आमदार चव्हाण यांनी सदर सूचना दिल्या. यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती सौ. प्रतिभा धुमाळ, प्रांतअधिकारी सचिन ढोले, तहसीलदार विजय जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
तालुक्याला यंदा चारा व पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कामांमध्ये हलगर्जीपणा करू नये, तसेच कुठलेही काम ताटकळत ठेवू नये. अगामी काळामध्ये जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होईल तेव्हा गरज असेल त्या ठिकाणी चारा डेपोची मागणी करावी. शेतकऱ्यांनीही चारा पिके घेण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे उपलब्ध झालेला चारा शासन विकत घेऊन शेतकऱ्यांना देऊ शकेल. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नाही याची जाणीव ठेऊन पाण्याचा काटकसरीने वापरा करावा असे आवाहन करून जुलै व ऑगस्ट अखेर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यादृष्टीने गरज असेल त्या ठिकाणी विहीर अधिग्रहण करणे, विहिरींचे खोलीकरण, आडवे बोअर मारणे, पाण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्त्या करणे, पाझर तलावांची दुरुस्ती व गाळ काढणे यासह आवश्यक कामे करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हापातळी स्तरापर्यंतच्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवावी असेही आ. दीपक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
फलटण तालुक्यासह धरण क्षेत्रातही पाऊस कमी पडल्याने आपणास पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. जर पाऊस पडला नाही तर आपणास उन्हाळ्यात तीव्र टंचाईस सामोरे जावे लागेल असे निदर्शनास आणून देत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, चारा टंचाई बाबत शासन निश्चितपणे निर्णय घेईल परंतु पाणी टंचाई बाबत आपणास अत्यंत जबाबदारीने नियोजन करावे लागेल. पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागेल. वेळप्रसंगी उपसा सिंचन योजना बंद करणे बाबतही कठोर निर्णय घ्यावे लागतील. शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धता ध्यानात घेऊनच उसासारख्या पिकाचे नियोजन करावे. शेतामध्ये जास्तीत जास्त चारा पिके घेण्याचा प्रयत्न करावा. टंचाईचा सामना करण्यासाठी ग्रामसेवकापासूनपासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यापर्यंत तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनाही समन्वयाने व गांभीर्याने काम करावे लागेल.
यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावनिहाय पाणी, चारा टंचाई व चार नियोजनाबाबत माहिती घेण्यात आली. तेव्हा विविध गावच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी लवकरात लवकर चार डेपो सुरू करावेत अशी मागणी केली.

No comments