खा. रणजितसिंह यांच्या संघर्षामुळेच तुमच्या हक्काचे पाणी तुम्हाला मिळाले - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वंचितापर्यंत त्याचे हक्क पोहोचवण्याकरता, येत्या काळामध्ये नवीन भारत उभा राहणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज निरा देवघरच्या उजव्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ होतोय, हे एक प्रकारे माढा लोकसभा मतदारसंघा करिता संक्रमण आहे. हे संक्रमण मोठे परिवर्तन घेऊन येणार आहे. ज्याला दुष्काळी मतदारसंघ म्हटलं जातं, तो दुष्काळाच्या कलंकाचा डाग पुसण्याचे काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करणार आहोत, तुमच्या हक्काचे पाणी तुम्हाला मिळणार आहे, ऐतिहासिक अश्या फलटणमध्ये, आज रामायणाचा नवीन अध्याय आपण सुरू करतोय, शेवटच्या माणसाचा आवाज जिथे ऐकला जातो, ते रामराज्य असतं, येत्या २२ तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान होतेय आणि त्याच्यासोबत मोदीजींच्या नेतृत्वात, एक नवीन अध्याय सुरू होतोय, त्या अध्यायामध्ये, आता शेवटच्या माणसाच्या विकासाचाच विचार होणार आहे, ज्याला मिळाले नाही, जो वंचित राहिला, त्या वंचितापर्यंत त्याचे हक्क पोहोचवण्याकरता, येत्या काळामध्ये नवीन भारत उभा राहणार आहे, नवीन महाराष्ट्र उभा राहणार आहे आणि म्हणूनच हा दुष्काळाचा कलंक पुसण्याचे काम सुरू केले आहे, हा वचनपूर्तीचा सोहळा आहे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माझ्या समक्ष वचन दिले होते, तुमच्या हक्काचे पाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, या वचनाची आज वचनपूर्ती होत आहे, खा. रणजितसिंह यांच्या संघर्षामुळेच आज तुमच्या हक्काचे पाणी तुम्हाला मिळणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा देवघर प्रकल्प, धोम बलकवडी जोड कालवा, नाईकबोमवाडी एमआयडीसी जमीन हस्तांतरण व फलटण बारामती रेल्वे लाईन प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छ. शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे ,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर ,आमदार राम सातपुते ,आमदार राजेंद्र राऊत ,आमदार शहाजीबापू पाटील, आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार रश्मीताई बागल , माजी आमदार दिलीपराव येळगावकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहीवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य जिजामाला नाईक निंबाळकर, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील देशमुख, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, सुशांत निंबाळकर, भाजप तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, फलटण तालुका विधानसभा प्रमुख सचिन कांबळे आदी उपस्थित होते.
आतापर्यंत मी अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या मात्र पाण्याची चोरी होते हे फलटणमध्ये प्रथमच ऐकले असून माझ्याकडे, इरिगेशनसह गृह विभाग पण असून दंड करण्याची सुद्धा माझी ताकद आहे असे सांगून हे चोरलेले पाणी पुन्हा दुष्काळी भागाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आणून दिले असून खऱ्या अर्थाने या भागातील दुष्काळ संपविण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेले आहे असे गौरवद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काढले.
नीरा देवकर प्रकल्प धोम बलकवडी प्रकल्प जोड कालवे, नवीन एमआयडीसी जमीन हस्तांतरण, या भागातील रस्ते, रेल्वे मार्ग या कामामुळे या भागाची चौफेर प्रगती होणार आहे, रोजगाराच्या अनेक संधी येथे येणार आहेत. तसेच मुंबई बेंगलोर कॉरिडॉर च्या माध्यमातून सातारा जिल्हात औद्योगिकरण होणार असल्याचे देवेंद्र फडणीस यांनी सांगितले.
तेविस वर्षे पाण्याच्या नावावर राजकारण केले आणि पाणी दिले नाही ते पाणी दुसऱ्या तालुक्याला स्वतःच्या स्वार्थासाठी देऊन फलटण, सांगोला, माळशिरस तालुक्याला दुष्काळात ठेवण्याचे काम आतापर्यंत या भागातील नेत्याने केले आहे. बारामतीला पाणी गेल्यामुळे कालव्यांची कामे रखडली मात्र ज्या पाण्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी संघर्ष केला ते पाणी आणण्यासाठी त्यांचे सुपुत्र रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार व्हावे लागले आणि त्यांनी हे पाणी आणूनच दाखवले असून, वचनपूर्ती करणारा हा एकमेव खासदार असल्याचे गौरवोद्गगार आमदार जयकुमार गोरे यांनी काढले.
तेवीस वर्षे रेल्वे काम रखडवले, तसेच नीरा देवघर कालव्याचे कामही रखडले होते, मात्र मी लोकसभा निवडणुकीत शब्द दिल्याप्रमाणे ३० दिवसात रेल्वे सुरू केली. तसेच दुसऱ्या तालुक्याने पळवलेले पाणी देखील बंद केले. नीरा देवघर, धोम बलकवडी प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला, फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग, फलटण बारामती रेल्वे मार्गाला निधी उपलब्ध करण्यात आला. धोम बलकवडीचे कालवे चारमाहीचे, आठमाही करण्यात आले, मी जनतेसाठी जो जो शब्द टाकला, तो तो शब्द देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलेला आहे. दुष्काळ मिटल्यामुळे या भागाला आता सुबत्ता येणार असून, येथून पुढे लोकसभेला जो आपण उमेदवार द्याल त्याला फलटणमधून ७० ते ८० हजाराचे मताधिक्य आम्ही देणार असून, माढा लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटाचा संपूर्ण निर्णय पक्षाने आणि नेतृत्वाने घ्यावा, त्याला मी बांधील असेन, पक्षाने एखादा दगड जरी उभा केला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावर राहील अशी ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.




No comments