Breaking News

गोरगरीबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सुभाषराव सूर्यवंशी- बेडके यांचे दुःखद निधन

Subhasrao Suryavanshi- Bedke passed away

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ -  श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी - बेडके यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा फलटण येथून दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून ३० वाजता राहत्या घरापासून काढण्यात आली. त्यांच्यावर फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास अनेक मान्यवर उपस्थित होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुले सचिन बेडके - सूर्यवंशी व महेंद्र बेडके - सूर्यवंशी , सूना व नातवंडे असा परिवार आहे. सुभाषकाकांच्या निधनाने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

    सुभाषकाकांचा जन्म  शेतकरी कुटूंबामध्ये झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. कै. नानांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. नानांच्या नंतर संस्थेची धुरा सुभाषकाकांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली. संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी सुभाषकाकांनी कष्ट घेतले  आहेत. फलटण शहरातील, तालुक्यातील सर्व थरातल्या लोकांना सुभाषकाका आपलेसे वाटत होते. सुभाषकाकांचा समाजातील सर्व घटकांशी स्नेह होता. गोरगरीबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. गुणी माणसांचा आदर करणारे आणि आपल्या भोवती नेहमी सर्वसामान्यांची मंदियाळी असणारे सर्व गुणसंपन्न व्यक्तीमत्व म्हणजे सुभाषकाका. सुभाष काकांच्या निधनाने राजकीय, शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.  

No comments