फलटणमध्ये चायनीज मांजामुळे अनेकजण जखमी ; पक्षीही अडकले
![]() |
| छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मांज्यामध्ये अडकलेला पक्षी दुसऱ्या छायाचित्रात युवकास चायनीज मांज्यामुळे झालेली जखम |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ - चायनीज मांजा वापरावर बंदी घातलेली असताना देखील अनेक जण चायनीज मांजा वापरत आहेत, आज नागपंचमीच्या दिवशीच फलटण येथे भगवान सॉमिल जवळ पुणे पंढरपूर रस्त्याने चाललेल्या दुचाकीस्वाराला मांजा कापल्यामुळे युवकाच्या तोंडापासून मानेपर्यंत जखम झाली आहे. युवकास पुढील उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले. तर मलठण मध्ये सौ. उर्मिला खलाटे यांच्या गळ्याला चायनीज मांजा मुळे जखम झालेली आहे. शहरात अनेक व्यक्तींना चायनीज मांजामुळे दुखापत झाल्याचे पुढे येत आहे. तसेच पक्षीही मांजा पासून वाचले नसून, आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मांजामध्ये पक्षी अडकला होता. दरम्यान मांज्या मुळे होत असलेल्या दुखापत पाहता, पोलीस प्रशासनाने मागील काही दिवसापासून चायनीज मांजा विरोधात आखलेली मोहीम आज मोठ्या प्रमाणात राबवून फलटण शहर व ग्रामीण भागात चायनीज मांजा प्रकरणी ठिकठिकाणी कारवाई केली.
![]() |
| चायनीज मांजा विरोधात पोलीस प्रशासनाकडून राबवण्यात आलेली मोहीम |
फलटण पुणे रस्त्यावर रानडे पेट्रोल पंप शेजारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान सागर लक्षण सोनवलकर वय २५, रा. भाडळी खुर्द ता. फलटण हा तरुण दुचाकीवरून जात असताना चायनीज मांजामध्ये अडकून गंभीर जखमी झाला. यावेळी चायनीज मांजाने त्याचे तोंड व मान कापली गेली. ही घटना पाहतानाच अनेकांच्या अंगावर शहारा आला होता. गंभीर जखमी झालेल्या सागरला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सागर यास फलटण येथील खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले. सागर सोनवलकर याच्या तोंडाला व मानेला गंभीर इजा झाली असून एकूण ३५ टाके पडले आहेत.
नागपंचमीच्या दिवशी चायनीज मांजाचा वापर पतंग उडवताना होत आहे. या मांज्यामुळे फलटण शहर व तालुक्यातील अनेक जण जखमी झाले असून, यामधून पशुपक्षीही वाचले नाहीत. रस्त्याच्या कडेला, गर्दीच्या ठिकाणी तसेच घराच्या छतावरून पतंग उडवणे बंद करावे व पतंग उडवण्यासाठी शहराबाहेर असणाऱ्या विमानतळाचा वापर करण्यात यावा अशी मागणी ही पुढे येऊ लागली आहे.


No comments