फलटण येथे राष्ट्रीय पातळीवरील स्टेडियम करण्यासाठी प्रयत्नशील - श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर
![]() |
बॅडमिंटन खेळताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, समवेत श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर, दीपक सपकाळ, नरेंद्र जगताप आदी. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ०५ : जाधववाडी (फ) येथे झालेल्या नरेंद्र जगताप बॅडमिंटन अॅकॅडमीच्या माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत. भविष्यात फलटण येथे राष्ट्रीय पातळीवरील स्टेडियम तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देतानाच जाधववाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून क्रीडासंकुल परिसर तसेच इतर ठिकाणी केलेले वृक्षारोपण व विविध उपक्रमांचे कौतुक विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण तालुक्यातील जाधववाडी (फ) येथे स्थापन झालेल्या नरेंद्र जगताप बॅडमिंटन अॅकॅडमीचे उद्घाटन श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, हरिभाऊ जमदाडे, सरपंच सीमा गायकवाड, मा. उपसरपंच दीपक सपकाळ, नीलेश जगदाळे, विक्रम पवार, सचिन मदने, तंटामुक्तीचे' अध्यक्ष फिरोज शेख, ग्रामविकास अधिकारी विजयराव निंबाळकर उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, फलटणला कुस्ती, हॉकी, आर्चरी, खो-खो आदी खेळांची मोठी परंपरा आहे. यातून राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू चमकले आहेत. त्यात बॅडमिंटन खेळाची भर पडते आहे, याचा आनंद आहे.
![]() |
बॅडमिंटन खेळताना संजीवराजे नाईक- निंबाळकर |
नरेंद्र जगताप यांचा बॅडमिंटन खेळातील अनुभव आणि कौशल्याचा फायदा नवोदित खेळाडूंना निश्चित होईल. त्यातून राज्य, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होतील असे असे प्रतिपादन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
श्रीमंत रामराजे व संजीवराजे यांनी बॅडमिंटन खेळून बॅडमिंटन अॅकॅडमीचा शुभारंभ केला. सुरवातीला नरेंद्र जगताप, राजेंद्र जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जयवंत तांबे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक सपकाळ यांनी आभार मानले. या वेळी सुभाष ढालपे, राजेंद्र कापसे, दत्तात्रय ढेकळे, संभाजी कदम, हिम्मत जगताप, तानाजी सस्ते, कैलास घाटगे, राजेंद्र मुळीक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments