Breaking News

राष्ट्रीय खो - खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Both the Maharashtra teams enter the semi-finals of the national Kho-Kho tournament

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १ नोव्हेंबर -   ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने  रुबाबात उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, उपांत्य फेरीत महाराष्ट्राचे किशोर कोल्हापूर विरुध्द  तर महाराष्ट्राच्या किशोरी राजस्थान विरुध्द लढणार आहेत.

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा येथील घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात सुरू झाली असून ही स्पर्धा दोन नोव्हेंबरपर्यंत चालेल.

    सायंकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्यपूर्व  सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी गुजरातवर १४-३ असा एक डाव ११ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्राच्या प्राजक्ता बनसोडेने ४ गुण मिळवले. धनश्री तामखडे ( ४:१० मि. संरक्षण), विद्या तामखडे(नाबाद २:४० मि. संरक्षण), स्वप्नाली तामखडे (२ मि. संरक्षण), मैथली पवार (२:२० मि. संरक्षण) व धनश्री कंक (२:५० मि. संरक्षण) यांनी संरक्षणाची भक्कम बाजू  सांभाळली. स्वप्नालीने ३ तर धनश्रीने २ गुणही संघास मिळवून दिले. तर गुजरातच्या रेणुकाने थोडाफार प्रतिकार केला.    

    महाराष्ट्राच्या मुलांनी केरळचा १८-३ असा एक डाव १५ गुणांनी धुव्वा उडविला. आशिष गौतमने ३ गुण मिळवत ४ मि. संरक्षण करताना अष्टपैलू खेळी केली. हाराद्या वसावेने नाबाद तीन मि. संरक्षण तर पार्थ देवकतेने आक्रमणात ४ गुण मिळवले.

    दुसऱ्या सामन्यात सिद्धेशच्या (२:२०,२:१० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळामुळे कोल्हापूरने पश्चिम बंगालचा १५-११ असा पराभव केला. बंगालकडून परमानिकने ३ गडी बाद करीत एकाकी लढत दिली.

अन्य उपांत्यपूर्व निकाल : मुली : कर्नाटका वि. वि. पश्चिम बंगाल १२-१० (४.१० मिनिटे राखून), राजस्थान तामिळनाडू १५-९, दिल्ली विदर्भ २३-१३. मुले : उत्तर प्रदेश वि. वि. हरियाणा २०-१६, कर्नाटका वि. वि. राजस्थान ११-८ डावाने.

असे होणार उपांत्य सामने : मुली : महाराष्ट्र वि. राजस्थान, कर्नाटक वि. दिल्ली. मुले : महाराष्ट्र वि. कोल्हापूर, कर्नाटक वि. उत्तर प्रदेश

No comments