ओला दुष्काळ जाहीर करावा - फलटण तालुका काँग्रेस
![]() |
तहसील कार्यालय फलटण येथे निवेदन देताना फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - फलटण तालुक्यासह राज्यात चालू असणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने फलटण तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. याप्रसंगी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे,सातारा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस शंकर लोखंडे,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस गंगाराम रणदिवे, युवक तालुका अध्यक्ष अजिंक्य कदम, अल्पसंख्याक विभाग शहर अल्ताफ पठाण, अनु.जा.ज. सेल अध्यक्ष अभिजित जगताप, युवक तालुका उपाध्यक्ष अमित फाळके, युवक शहर उपाध्यक्ष अभिलाष शिंदे,श्रेयस कदम आदी उपस्थितीत होते.
फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. शेतकरी जगला तर देश जगेल, परंतु परतीच्या पावसाने राज्यातील शेती व शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे. राज्यात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. असे असताना सुध्दा प्रशासनामार्फत पंचनामे झालेले नाहीत. खरे तर शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. १) राज्यात ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा. २) शेतकर्यांना सरसकट हेक्टरी ७५ हजार रुपये मदत देण्यात यावी. ३) फलटण तालुक्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी. ४) मजुंरासाठी विशेष अनुदान जाहिर करण्यात यावे. ५) मोदी सरकारच्या चुकीच्या शेतकरी धोरणामुळे भारताची जागतिक भुक निर्देशांकात घसरण झालेली आहे.हे खेदजनक आहे.आपला देश जगातील १२१ देशांमध्ये १०७ व्या क्रमांकावर आलेला आहे.तरी केंद्र सरकारने नव्याने शेतकरी धोरण शेतकरी हिताचे व व्यापक स्वरुपात मांडावे. अशा स्वरुपाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
No comments