Breaking News

अखेर गजानन चौकात महात्मा गांधींचा पुतळा बसला ; काँग्रेस कडून स्वागत तर भाजपकडून टीका

गजानन चौक येथे बसविण्यात आलेला महात्मा गांधी यांचा नविन पुतळा
Finally the statue of Mahatma Gandhi was placed in Gajanan Chowk

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १ : शहरातील गजानन चौक येथे मध्यरात्री नंतर महात्मा गांधी यांचा पुतळा फलटण नगरपरिषदेच्यावतीने बसविण्यात आला. सदर पुतळा रात्रीचा बसविल्याने भाजपने नगरपरिषदेच्या कारभारावर टिकेची झोड उठविली असून काँग्रेसच्यावतीने मात्र मुख्याधिकारी संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

            फलटण शहरातील गजानन चौकातील महात्मा गांधी यांचा जुना पुतळा जीर्ण झाल्याने फलटण नगरपरिषदेने तो काढला होता व तेथे लवकरच नविन पुतळा बसविण्यात येईल असे जाहिर केले होते. परंतू जुना पुतळा हटविल्यानंतर नविन पुतळा बसविण्याबाबत फलटण नगरपरिषद वेळकाढूपणाचे धोरण अवलंबीत असल्याचा आरोप करुन राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी टिकेची झोड उठविली होती. काँग्रेस पक्षाने याबाबत वेळोवेळी आंदोलनाचा इशारा देत आंदोलनेही केली होती. गेल्या काही दिवसांपुर्वीच २ आक्टोंबर गांधी जयंती पर्यंत महात्मा गांधी यांचा पुतळा बसवा अन्यथा न्यायालयात दाद मागाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे फलटण नगरपरिषद पुतळा बसविण्याबाबत कोणती पावले उचलणार याचीही उत्सुक्ता होती. 

    शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नंतर मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी नगरपरिषदेचे अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्या सहाय्याने गजानन चौकातील उभारलेल्या चबुतऱ्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बसविला. सकाळनंतर पुतळा बसविल्याची चर्चा वेगाने सर्वत्र पसरल्यानंतर याबाबत सोशल मिडीयावर  संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, भाजपचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी हा पुतळा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आहे याचे भान फलटण नगरपरिषदेने ठेवुन तो समारंभपुर्वक बसवायला हवा होता. या कृतीतुन नगरपरिषदेची निष्क्रियता व महापुरुषांबद्दलचा अनादर दिसून येतो. केवळ आंदोलन टाळण्यासाठी पुतळा रात्री अपरात्री व चोरुन बसविने हे शोभनीय नाही. परंतू तीन वर्षानंतर पुतळा बसविला हे फलटणकरांचे भाग्यच म्हणावे लागेल अशी टिका केली. काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमिरभाई शेख यांनी शब्द पाळल्याबद्दल मुख्याधिकारी यांचे अभिनंदन व्यक्त केले आहे. तर फलटण तालुका काँग्रेसचे युवा नेते सचिन सूर्यवंशी-बेडके व तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत पुतळा बसविल्याबद्दल मुख्याधिकारी संजय गायकवाड याचा काँग्रेस पक्षाच्यावतीने सत्कार करुन अभिनंदन केले. 

No comments