Breaking News

मुधोजी महाविद्यालयाच्या 'उदय' वार्षिक अंकास शिवाजी विद्यापीठाचे पारितोषिक

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मुधोजी महाविद्यालयाच्या उदय वार्षिक अंकास शिवाजी विद्यापीठाचा सन २०१९-२० या वर्षाचा तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाच्या उदय अंकास प्रथमच हे पारितोषिक मिळाल्याने, फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले व महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने ही बाब निदर्शक असल्याचे प्रतिपादन केले आहे.  

    शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या पारितोषिक समारंभ सोहळ्यामध्ये हे पारितोषिक जाहीर करण्यात आले . या सोहळ्यासाठी कुलसचिव प्रोफेसर शिंदे तसेच उपकुल सचिव  डॉ. प्रमोद पांडव विशेष कक्ष तसेच विविध व्यावसायिक व बिगर व्यावसायिक गटातील पारितोषिक प्राप्त महाविद्यालयाचे प्राचार्य व संपादक या कार्यक्रमास उपस्थित होते. 
महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक हा महाविद्यालयाचे प्रतिबिंब दर्शवणारा आरसा असतो असे प्रतिपादन करून, पारितोषिक विजेत्या महाविद्यालयांचे अभिनंदन  शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रोफेसर डॉ. पी . एस.पाटील यांनी केले.

    मुधोजी महाविद्यालयाच्या उदय वार्षिक अंकास सन २०१९-२० या वर्षाकरिता मिळालेले पारितोषिक स्वीकारण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एच. कदम व उदय अंकाचे संपादक प्राध्यापक लक्ष्मीकांत बेळेकर कार्यक्रमास उपस्थित होते.  उदय अंकास तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल फिरता चषक व प्रशस्तीपत्र देऊन विद्यापीठातर्फे गौरविण्यात आले.

    याप्रसंगी संपादक लक्ष्मीकांत बेळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिल्याने त्यांचे लेख गुणवत्तापूर्ण झाल्याचे मत मांडले. 

    या अंकामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचा अविष्कार केलेला असून विविध प्रकारांमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळेच पारितोषिक प्राप्त झालेले आहे, यापुढेही महाविद्यालयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाची प्रभारी प्राचार्य कदम यांनी केले व सर्व विद्यार्थी आणि संपादक मंडळ यांचे अभिनंदन केले.

No comments