चौधरवाडी येथे वीज अंगावर पडल्याने ३ गाईंचा मृत्यू
![]() |
वीज अंगावर पडल्याने दगावलेल्या ३ दुभत्या जर्सी गाई. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ : फलटण शहर व परिसरात रविवार दि. १६ रोजी सायंकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट व वीजांच्या कडकडाटात सुरु झालेला पाऊस रात्री उशीरा पर्यंत पडत असताना शहरालगत चौधरवाडी येथील एका जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यातील ३ गाई साठी काळ रात्र ठरला वीज पडल्याने या ३ गाई दगावल्या आहेत.
सावंतवस्ती, चौधरवाडी, ता. फलटण येथील गट नंबर ७३/३अ मधील किसन तथा कृष्णराव बाबुराव सावंत यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या त्यांच्या मुक्त संचार गोठ्यातील ३ किंमती जर्सी गाई वीज अंगावर पडल्याने जागीच ठार झाल्या आहेत. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजताच पोलिस पाटील सौ. रसिकाताई हेमंत भोसले यांनी तातडीने याबाबत तहसीलदार व ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती देवून स्वतः घटनास्थळी जाऊन सावंत कुटुंबाला आधार देण्याचे काम केले.
शेतीला जोड धंदा म्हणून सुरु झालेला दुग्ध व्यवसाय अलीकडे अनेक कुटुंबांचा मुख्य व्यवसाय बनला आहे. सावंत कुटुंबाकडे या मुक्त संचार गोठ्यात लहान मोठी एकूण १० जनावरे होती, त्यापैकी ३ दुभत्या गाई या नैसर्गिक आपत्ती मध्ये मृत्यू मुखी पडल्याने सावंत कुटुंबावर अक्षरशः आभाळच कोसळले आहे.
तहसीलदार समीर मोहन यादव यांच्या सुचने नुसार महसूल मंडलाधिकारी जोशी आणि गाव कामगार तलाठी योगेश धेंडे यांनी पंचा समवेत सावंत वस्तीवर जाऊन पंचनामा केला असून वीज अंगावर पडल्याने प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये किमतीच्या २ आणि १ लाख १५ हजार रुपये किमतीची एक अशा एकूण ३ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या ३ जर्सी गाई दगावल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. शवविच्छेदनानंतर ३ ही गाईंचे दफन करण्यात आले आहे.
शासकीय नियमानुसार सदर गाईंच्या मालकास प्रत्येकी ४० हजार रुपये प्रमाणे १ लाख २० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात येत असल्याचे तहसीलदार समीर मोहन यादव यांनी सांगितले आहे.
No comments