Breaking News

महाज्योती च्या माध्यमातून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार

Various activities will be conducted for the students of OBC through Mahajyoti

    मुंबई : विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी ‘महाज्योती’ने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेत असून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

    महाज्योतीच्या संचालक मंडळाची नुकतीच मंत्रालय येथे बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना मंत्री श्री.अतुल सावे बोलत होते. यावेळी या बैठकीला महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे,संचालक डॉ. सिद्धार्थ गायकवाड,मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल वासनिक,कंपनी सेक्रेटरी अविनाश गंधेवार उपस्थित होते.

    मंत्री श्री.अतुल सावे म्हणाले, पीएच.डी. करणाऱ्या उमेदवारांना अवॉर्ड दिनांकापासून पहिल्या दोन वर्षांसाठी रु.३१ हजार, तसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च तर पुढील तीन वर्षासाठी रु.३५ हजार तसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. एम. फिल. उमेदवारांना एम. फिल ते पीएच.डी. असे Integrated (एकत्रित ) देण्याबाबत बार्टी, पुणे च्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशी नुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    मंत्री श्री. सावे म्हणाले, एम. फिल. उमेदवारांना रु.३१ हजार, घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याचाही निर्णय घेण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेसाठी दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन रु.१३ हजार आणि रुपये १८ हजार आकस्मिक एकवेळ खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांना रु.२५ हजार एकवेळ अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या २० उमेदवारांना रु.१० हजार प्रतिमाह विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

No comments