Breaking News

योग्य औषधोपचार व लसीकरण करुन घ्या ; लंपी रोगाला हद्दपार करा - श्रीमंत रामराजे नाईक नाईक निंबाळकर


Take proper medication and vaccination; Banish lumpy disease - Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -   फलटण तालुक्यात जनावरांमध्ये लंपी हा रोग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. आगामी दिवसांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव फलटण तालुक्यामध्ये वाढू न देण्यासाठी, फलटण तालुका प्रसाशनाने सदैव कार्यरत राहावे. जनावरांमध्ये असलेल्या लंपी या रोगाला फलटण तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी कार्यरत राहा.  प्रशासनाकडून लसीकरण पूर्ण करण्याबरोबर बाधीत जनावरांवर आवश्यक उपाय योजना सुरु केल्याने कोणीही घाबरुन न जाता योग्य औषधोपचार व लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे  नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

    फलटण पंचायत समितीच्या सभागृहात लंपी रोगाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, पशुसंवर्धन विभागाचे सातारा उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे, पंचायत समितीचे माजी सभापती शंकर माडकर, सौ. प्रतिभा धुमाळ, माजी उपसभापती सौ. रेखा खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी आमदार श्रीमंत रामराजे म्हणाले कि, फलटण तालुक्यामध्ये पशुधनातील लंपी या आजाराची सुरवात झाल्यापासून आज अखेर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलेले आहे. आगामी काही आठवड्यात फलटण तालुक्यात १०० % लसीकरण पूर्ण होईल. त्यानंतर लंपी बाधित पशुधन संख्या कमी होईल. सद्य परिस्थितीमध्ये फलटण तालुक्यात असलेल्या लंपी या आजाराला रोखण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने कार्यरत राहून शेतकऱ्यांना पूर्णतः मदत करावी.
फलटण तालुक्यात लंपी या पशुधनामधील आजाराचे मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला आहे. फलटण तालुक्यात लंपी पासून बचाव करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यामध्ये लंपीचे सर्वाधिक रुग्ण हे फलटण तालुक्यात आहेत. लंपी हा म्हशींमध्ये उद्भवत नाही. लंपी हा फक्त गोवंशीय प्राण्यातच आढळून येत आहे. त्यामुळे आगामी काळात लंपी बाबत दक्ष राहूनच अधिकाऱ्यांनी कामकाज करावे, असे मत आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

    फलटण तालुक्यामधील जनावरांचे लंपीचे लसीकरण जवळपास ८० % झालेले आहे. आगामी काही दिवसामध्ये फलटण तालुक्यातील १०० % जनावरांचे लसीकरण पूर्ण होईल. फलटण तालुक्यात लंपीचा उपचार करण्यासाठी ज्या ठिकाणी वाहनांची व मनुष्यबळ कमतरता असेल त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तातडीने यंत्रणा उभी करू. पशुसंवर्धन विभागातील जी पदे फलटण तालुक्यातील रिक्त आहेत. त्या ठिकाणी कंत्राटी पद्धीतीने पदे भरलेली आहेत. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यात सुमारे २५ पशुवैद्यकीय दवाखाने सुरु होण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत, असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

    लंपी स्किन डीसीज हा आजार डांस, गोचीड वगैरे द्वारे पसरत असून या संसर्गजन्य आजार बाधीत जनावरांसाठी योग्य औषधोपचार आणि लसीकरण करतानाच आपला गोठा व परिसर स्वच्छ ठेवल्यास हा संसर्गजन्य आजार पसरविणाऱ्या डांस, गोचीड, चीलटांचा प्रतिबंध झाल्याने अन्य जनावरांना हा आजार होणार नाही याची नोंद घेऊन योग्य उपाय योजना करण्याचे आवाहन यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

    सुमारे ५ हजार जनावरांसाठी एक पशू वैद्यक दवाखाना असे निकष विचारात घेता फलटण तालुक्यात पुरेसे दवाखाने आणि आवश्यक अधिकारी/कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही तथापि उपलब्ध अधिकारी/कर्मचारी यांच्या मदतीला शासनाच्या मान्यतेने खाजगी पशू वैद्यक आणि पशू वैद्यकिय महाविद्यालय, शिरवळ येथील विद्यार्थ्यांची मदत घेऊन तालुक्यात ८० टक्के पर्यंत लसीकरण पूर्ण केल्याचे निदर्शनास आणून देत उर्वरित लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे. पुरेशी लस मात्रा उपलब्ध असल्याचे तसेच गेल्या २ दिवसात काही अधिकारी/कर्मचारी ही शासनाने उपलब्ध करुन दिल्याचे पशू संवर्धन उपायुक्त डॉ. परीहार यांनी निदर्शनास आणून दिले.

    गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी समारोप व आभार मानले.

No comments