Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत फलटण मधील ५१ घरकुलाना मंजुरी - मुख्याधिकारी निखिल मोरे

Approval for 51 houses in Phaltan under Pradhan Mantri Awas Yojana - Chief Officer Nikhil More

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)दि.३ जुलै २०२५ - प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० या योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांचे सर्व्हेक्षण करून त्यापैकी पात्र अर्जांच्या छाननी अंती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, तत्कालीन नगर अभियंता मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमएवाय कक्षातील अभियंता  सिमरन पठाण आणि   अमोल कदम  यांच्यामार्फत बीएलसी या घटकांतर्गत ५१ घरकुलांचा सविस्तर प्रकल्प अहवाल वेब पोर्टल वरती मंजुरी करिता सादर करण्यात आला आहे.  केंद्रशासनाने दि. ३०/०६/२०२५ रोजीच्या केंद्रीय सीएसएमसी  बैठकीमध्ये सदर ५१ घरकुलांना मंजुरी देऊन प्रति लाभार्थी २,५०,०००/- रु. इतके अनुदान मंजूर केले असल्याचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

    फलटण नगरपरिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी १.० या योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या  बीएलसी घटकांतर्गत एकूण १८५ घरकुले मंजूर असून त्यापैकी १७० घरकुले पूर्ण झालेली आहेत.  नगरपरिषदेमार्फत घरकुला करिता आत्तापर्यंत ३,८८,२०,०००/- रु. (तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार) इतके अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.

    फलटण नगरपरिषदेमार्फत  सद्यस्थितीत  केंद्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ची अंमलबजावणी गतिमान पध्दतीने करणेकरिता प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी, शहरातील विविध ठिकाणी मेळावे व सभा घेऊन इच्छुक लाभार्थ्यांना माहिती देण्याचे काम सुरु आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक लाभार्थींनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन फलटण नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे.



No comments