Breaking News

सत्तास्थाने असूनही मूलभूत सुविधा पुरवू शकत नाहीत, ही भाकरी फिरवावीच लागणार - आ. जयकुमार गोरे

Inspite of power, they cannot provide basic facilities. Jayakumar Gore

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - अडीच वर्षात आपण सर्वांनी इतिहास घडवला, माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, या किल्ल्याला आपण सुरुंग लावला व रणजीतसिंह यांना विजयी केले, योग्य माणसाला निवडून देण्याचे काम या माढा मतदार संघाने केले आहे, त्याबद्दल सर्व जनतेला मनापासून धन्यवाद!  संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व इथे उपस्थित आहात त्याबद्दल आपले स्वागत व आपल्या सर्वांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून या देशाचा चेहरा मोहरा बदलला आहे, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून, सर्व लोकांचे जीवनमान सुधारले पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रकारच्या योजना अंमलात आणल्याचे आ.जयकुमार गोरे यांनी सांगितले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते  २ ऑक्टोबर सेवा पंधरावडा निमित्ताने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी फलटण तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय गावांचा दौरा करून, तालुक्यातील नागरीकांच्या समस्या, अडचणी व प्रश्न जाणुन घेवून त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून जनतेशी संवाद साधला. त्यानंतर दि. १८ सप्टेंबर रोजी गजानन चौक फलटण येथे घेतलेल्या संवाद मेळाव्यात आमदार जयकुमार गोरे  बोलत होते याप्रसंगी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, जि. प.सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एवढी सत्तास्थाने देऊनही मूलभूत सुविधाही पुरवू शकत नाहीत

    दोन दिवस फलटण तालुक्यातील गणनिहाय गावांना भेटी दिल्यानंतर  तालुक्यातील लोक अडीअडचणी सांगत होते, ते ऐकून मला नवल वाटले कारण मागील 30 वर्षे सत्ता ही रामराजे यांच्याकडे होती.  सभापती पद, पालकमंत्री, मंत्री एवढी सत्तास्थाने दिल्यानंतर देखील गावागावात मूलभूत सुविधाही पुरवू शकत नाहीत. लोकांचे अनेक प्रश्न, अडचणी आहेत त्या मार्गी लावू शकत नाहीत, मतदार संघात व्यवस्थित रस्ते नाहीत, की कुठली विकास कामे केलेली नाहीत, मी दहावी, अकरावीला फलटणला होतो त्यावेळी जिंती नाक्याचा रस्ता होता तसाच आजही दिसून येतो याचे नवल वाटतेय अशी खोचक टीका आ.जयकुमार गोरे यांनी केली.

... तर फलटणचा विकास कसा होणार ? 

    खासदार रणजितदादांनी  नाईकबाेमवाडी येथे एमआयडीसी मंजूर करत असताना अनेक मीटिंगा घेऊन मंजुरी मिळवली, पण एमआयडीसी व्हावी यासाठी पुढारी बैठका घेतात पण या तालुक्यातील पुढारी एमआयडीसी होऊ नये म्हणून रामराजे बैठका घेत होते. आज रणजितदादांचा कारखाना नसता तर आपली काय अवस्था झाली असती आपण ऊस कुठे घातला असता, रामराजे यांनी तासगावकारांचा कारखाना होऊ दिला नाही, कारखाना होऊ द्यायचा नाही, एमआयडीसी होऊ द्यायची नाही, तिथलं पाणी बारामतीला द्यायचं, या सगळ्या गोष्टी करायच्या आणि आपला कारखाना मात्र दुसऱ्याला चालवाला द्यायचा, हे कुठलं धोरण आहे. मालोजी बँक पतसंस्थेला चालवायला दिली हे जगातलं पहिले उदाहरण आहे, आशा पध्द्तीने नेते जर असतील तर फलटणचा विकास कसा होणार ? असा सवाल आ.जयकुमार गोरे यांनी केला.

त्यासाठी ही भाकरी फिरवावीच लागणार

    भुयारी गटारी योजना ७२ कोटीची असताना देखील ३२ टक्के वाढीव टेंडर कंत्राटदाराला दिले, आज फलटण शहरातील सर्व हॉस्पिटल डेंग्यु पेशंटने भरली आहेत, कोण विचार करते फलटणचा?  आज ही परिस्थिती का निर्माण झाली आहे, आपण सर्वांनी विचार करायची गरज आहे, आपण सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे, एकदा कधीतरी भाकरी फिरवली पाहिजे, जर हे बदलले नाही तर, तालुक्यातील ही परिस्थिती अशीच सुरू राहणार आहे, त्यासाठी ही भाकरी फिरवावीच लागणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.

No comments