Breaking News

तुम्हाला किती ताकद लावायची ती लावा, नगर पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवणारच - खा. रणजितसिंह

BJP will come to power in Phaltan Municipal Corporation

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - खासदार झाल्यानंतर  मतदार संघातील ् प्रलंबित प्रश्न होते ते सोडवले, निरा देवघरचे पाणी थांबवण्याचे काम केलं, 23 वर्षापासून बंद पडलेला रेल्वेचा प्रकल्प सुरू केला, एमआयडीसीची फाईल पुढे सरकवून मंजुरी घेतली, आदर्की - फलटण मार्ग, फलटण - शेणोली मार्ग, पालखी महामार्ग, रेल्वेचे भूसंपादन पैसे, बारामती सांगली महामार्ग जवळपास एक लाख कोटी रुपयांचे रस्ते तुमच्या खासदाराने माढा मतदार संघात आणलेले आहेत, माण तालुक्यात देखील लक्ष्मणराव इनामदार पाणी योजनेसाठी 650 कोटी निधी पंतप्रधानांच्या मार्फत मंजूर करून आणला आहे, आता फक्त निरादेवघरचा प्रश्न मार्गी लावण्याचे बाकी आहे,  आता तुमच्याबरोबर दोन हात करायला मी मोकळा आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी मोकळा आहे, मी तुम्हाला आजच या व्यासपीठावर सांगतो की, तुम्हाला किती ताकद लावायची आहे ती लावा, पण फलटण नगर पालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असे खुले आव्हान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिले. 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते  २ ऑक्टोबर सेवा पंधरावडा निमित्ताने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी फलटण तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय गावांचा दौरा करून, तालुक्यातील नागरीकांच्या समस्या, अडचणी व प्रश्न जाणुन घेवून त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून जनतेशी संवाद साधला. त्यानंतर दि. १८ सप्टेंबर रोजी गजानन चौक फलटण येथे घेतलेल्या संवाद मेळाव्यात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर बोलत होते याप्रसंगी आ. जयकुमार गोरे, जि. प.सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व गुंड - तडीपार राजेगटाकडे आहेत

    राजेगटाने गेले 30 वर्ष फलटण तालुक्याचे वाटोळे केले आहे, सर्व रस्त्यांची वाट लागली आहे, गटारे तुंबली आहेत, नागरिकांना पाणी मिळत नाही सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण आहे त्यामुळे डेंगूची साथ सुरू आहे, फलटण मधील सर्व गुंड तडीपार हे राजेगटाकडे आहेत,  त्यामुळेच फलटणमध्ये विकासाच्या कामांमध्ये भ्रम आहे. मी जेवढी कामे एका वर्षामध्ये केली तेवढी यांनी तीस वर्षात केलेली नाहीत. मी  मतदारसंघात एवढा निधी आणून टाकला आहे की  आतापर्यंतच्या कारकीर्दीत त्यांनी तेवढा देखील आणला नाही, यांनी मात्र मालोजीराजे बँक पतसंस्थेला चालवायला दिली,  श्रीराम सहकारी कारखाना दिला जवाहरला चालवायला, तासगावकर कारखाना सुरू करणार होता, तर त्यांना विरोध करून कारखाना सुरू करू दिला नाही, नाईकबोमवाडी एमआयडीसी मंजूर होऊ नये म्हणून सभापती असताना रामराजे यांनी त्यांच्या दालनात मीटिंग घेतली होती अशा प्रकारची कामे रामराजे व त्यांचे भाऊ करत असल्याची  टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

खोट्या केसेस करणाऱ्यांना आपली सत्ता द्यायची आहे का?

    माझाच एक कार्यकर्ता फोडुन त्याच्या माध्यमातून माझ्यावर ३० केसेस दाखल केल्या, परंतु एकही केस सिद्ध करू शकले नाहीत. मला अडकवण्याचा प्रयत्न केला पण सर्व उलटे झाले, माझ्यावर विनयभंगा सारख्या खोट्या केसेस केल्या, माझ्या पत्नीच्या विरोधात खोट्या केसेस केल्या, जया भाऊंच्या विरोधात तसेच त्यांच्या पत्नीच्या विरोधात देखील खोट्या केसेस, रामराजे यांनी केल्या पण असल्या कटकारस्थानाला मी घाबरणार नाही, त्यांना पुरून उरणार आहे, घरातल्या बायकांच्या विरोधात केसेस करता इतकी तुमची नियत खाली घसरलेले आहे,  आशा खोट्या केसेस करणाऱ्यांना आपली सत्ता द्यायची आहे का? असा सवाल रणजीतसिंह यांनी केला.

ताकदीचा उपयोग मी विकास कामासाठीच केला

    जनतेला उद्देशून खासदार रणजीतसिंह म्हणाले की, तुम्ही दिलेल्या ताकदीचा उपयोग मी चांगल्या विकास कामासाठीच करत आहे, ताकदीचा अयोग्य वापर कधीच करणार नाही, या मातीसाठी या मतदारसंघासाठी जे काही चांगलं करता येईल तेच करणार आहे, या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यासाठी चांगलं काम करणार आहे, भाजपच्या नेतृत्वाखाली तरुणांचं भविष्य घडवण्याचं काम करणार आहे, या फलटण मधून मला बुलेट ट्रेन चाललेली पहायची आहे, फलटण मधून विमाने उडताना पाहायची असल्याचे सांगून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिष्टचिंतन करून, पंतप्रधानांनी  जनतेसाठी केलेल्या योजनांचे  विवेचन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. 

No comments