Breaking News

राजधानी सातारा झाले तिरंगामय ; 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत प्रत्येक घरांवर तिरंगा फडकवावा - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

Tiranga should be hoisted on every house from 13th to 15th August - Collector Ruchesh Jayavanshi

    सातारा दि. 11 (जिमाका): सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक पार्श्वभूमी आहे. हा जिल्हा क्रांतिवीरांचा जिल्हा आहे. त्याचबरोबर  देशाला दिशा देणारा जिल्हा आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. या उत्साहात नागरिकांचाही मोठा प्रतिसाद लाभत आहे. दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा ध्वज फडकावून स्वराज्य महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रम जिल्ह्यात उत्साहाने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज जिल्हा प्रशासनाने ऐतिहासिक राजधानी सातारा शहरात तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीमुळे राजधानी सातारा तिरंगामय झाले होते.

    प्रारंभी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरी मार्गस्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी व सातारा शहरातील विविध शाळेंचे हजारो विद्यार्थी उपस्थित होते.

    भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत प्रभात फेरीला जिल्हा परिषदेमधून सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा, पोलीस अधीक्षक श्री. बंसल यांच्यासह हजारो विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते.   पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण व स्वातंत्र्य सैनिक किसन वीर यांच्या पुतळ्यास पुष्पहार   घालून अभिवादन करण्यात आले.

जिल्हा परिषदेतील ध्जव विक्री केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

    ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्हा परिषदेमध्ये उभारण्यात आलेल्या ध्वज विक्री केंद्रास जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी भेट दिली. या ध्वज विक्री केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी केले.

No comments