सह्याद्री कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यात नामवंत पैलवानांची हजेरी ; पै. प्रकाश बनकरने जिंकली प्रथम क्रमांकाची कुस्ती
![]() |
पै. प्रकाश बनकर आणि पै. बंटी यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार शेजारी सह्याद्री भैय्या कदम, महाराष्ट्र केसरी पै. बापूदादा लोखंडे वगैरे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : उप महाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर (वस्ताद विश्वास हारुगले यांचा पठ्ठा, मूळचा सदशिवनगरचा मात्र सध्या गंगावेश कोल्हापूर येथे सराव करीत असलेला) याने, आयोजित कुस्ती आखाड्यात २ लाख रुपये इनामाची प्रथम क्रमांकाची कुस्ती, हरियाणा केसरी पै. बंटी याचा, आतील टांग या डावावर पराभव करुन जिंकल्या बरोबर कुस्ती शौकिनांनी एकच जल्लोष केला.
युवानेते सह्याद्री भैय्या चिमणराव कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फलटण - गिरवी रस्त्यावर झिरपवाडी गावच्या हद्दीत जयभवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी संचलित राजीव गांधी पॉलिटेक्निकच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कुस्ती आखाड्यात लहान मोठ्या सुमारे ६० कुस्त्या झाल्या.
गावोगावच्या यात्रा मधील कुस्त्यांचे फड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरविले गेले नाहीत आणि गेल्या अनेक वर्षात फलटण शहर व तालुक्यात कुस्त्यांचे मोठे फड भरविले गेले नसल्याने असंख्य कुस्ती शौकिनांनी राजकीय गट तट, पक्षीय राजकारण सर्व काही बाजूला ठेवून कुत्यांच्या या मैदानात हजेरी लावून आनंद घेतला, त्यामुळे मोठी गर्दी झाली होती, मात्र सायंकाळी ५ वाजता सुरु झालेले हे कुस्त्यांचे जंगी मैदान रात्री ९.३० पर्यंत अखंड सुरु असूनही कसलाही वाद विवाद न होता सारे, शांततेत, आनंदात आणि उत्साहात पार पडले.
![]() |
पै. बंटी याचा आतली टांग डावावर चीटपट करुन विजयश्री प्राप्त करताना पै. प्रकाश बनकर, शेजारी भरगच्च व्यासपीठ |
पै. महारुद्र कालेळ (वस्ताद आस्लम काझी यांचा पठ्ठा, छ. आखाडा कुर्डूवाडी) आणि पै. मुन्ना झुंझुर्के (नाना वस्ताद यांचा पठ्ठा) यांच्यातील दीड लाख रुपये इनामाची द्वितीय क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.
एक लाख रुपये इनामाची तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. जयदीप गायकवाड याने (अर्जुन वीर काका पवार यांचा पठ्ठा वाखरी ता. फलटण) पै. नागेश शिंदे (काका बराटे पुणे यांचा पठ्ठा) याचा घुटना डावावर पराभव करुन जिंकली, एक लाख रुपये इनामाची, चतुर्थ क्रमांकाची कुस्ती अटके येथील पै. शंकर बंडगर (महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके तालीम) याने खवसपुरचा पै. विक्रम घोरपडे याचा डंकी डावावर पराभव करुन जिंकली, ५ व्या क्रमांकाची कुस्ती पै. आकाश माने याने घीस्सा डावावर पै. सागर शिंदे (छ. आखाडा कुर्डूवाडी) याचा पराभव करुन जिंकली, पै. तुषार सरक (शुक्रवार तालीम वस्ताद राहुल सरक मिरगाव यांचा पठ्ठा) याने ६ व्या क्रमांकाची कुस्ती पै. विकास शिंदे (छ. आखाडा कुर्डूवाडी) याचा एकचक डावावर पराभव करुन जिंकली, ७ व्या क्रमांकाची कुस्ती पै. गणेश कोकरे (वस्ताद नवनाथ शेंडगे खडकी यांचा पठ्ठा) याने पै. निकेतन पाटील (छ. आखाडा कुर्डुवाडी) याचा मोळी डावावर पराभव करुन विजय प्राप्त केला, सोमंथळीचा पै. संदेश शिपकुले याने पै. ओंकार कोकाटे (छ. आखाडा कुर्डुवाडी) याचा डंकी डावावर पराभव केला.
कुस्ती क्षेत्रातील जाणकार निवेदक शंकर आप्पा पुजारी आणि प्रा. अजय कदम यांनी उत्तम निवेदनाद्वारे आखाड्यातील पैलवानांची ओळख करुन देत, त्यांनी यापूर्वी मारलेल्या मैदानांची माहिती दिली आणि आखाड्यात सुरु असलेल्या कुस्ती विषयी माहिती देत पैलवानांना प्रोत्साहन दिले, तर इचलकरंजीचा हलगी वादक राजू आवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हलगी व पारंपरिक वाद्यांनी आखाड्यात वेगळीच रंगत आणली.
महाराष्ट्र केसरी बापुदादा लोखंडे, महाराष्ट्र केसरी गोरख सरक, उप महाराष्ट्र केसरी चंद्रकांत सुळ, उप महाराष्ट्र केसरी आबा सुळ, कामगार केसरी ज्ञानदेव पालवे आणि विविध तालमी मधील वस्ताद मंडळी यांनी संपूर्ण आखाड्याचे उत्तम नियोजन केले.
युवा नेते सह्याद्री भैय्या कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कुस्ती मैदानाचे उत्तम नियोजन प्रा. अजय कदम, हिंदुराव लोखंडे, शंभू दडस, बापू जाधव, सचिन फडतरे, अंकुश सावंत यांच्या सह जयभवानी एज्युकेशन सोसायटी मधील कर्मचारी यांनी केले.
सातारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांनी कुस्ती आखाड्यास भेट देवून युवा नेते सह्याद्री कदम व त्यांच्या सहकाऱ्यांचे उत्तम नियोजना बद्दल कौतुक करीत माजी आमदार स्व. चिमणराव कदम व आपल्या घनिष्ठ मैत्रीची आठवण करुन देत त्यांना कुस्ती आखाड्या विषयी असलेल्या आवडीची माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सह्याद्री भैय्या चिमणराव कदम यांनी आयोजित केलेल्या या कुस्ती आखाड्यातील कुस्त्या पाहण्यासाठी तालुक्यातील विविध सहकारी संस्था, ग्रामपंचायत, विकास सोसायट्यांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपले राजकीय मतभेद, राजकीय स्पर्धा, उद्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूकांमध्ये प्रसंगी एकमेकांविरुद्ध उभे राहुन निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता असूनही हे सर्व विसरुन किंवा बाजूला ठेवून या कुस्ती आखाड्यात हजेरी लावली आणि आनंद घेतल्याचे दिसून आले.
No comments