Breaking News

श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन

 Shrimant Maloji Raje and Shrimant Shivaji Raje Memorial Festival Organized from 14th to 25th May

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटणच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही दि. १४ ते २५ मे दरम्यान श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून फलटण शहर व तालुक्यातील अबालवृद्धांनी त्यामध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी केले आहे.

    श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांची ४४ वी पुण्यतिथी दि. १४ मे २०२२ आणि माजी आमदार श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर तथा श्रीमंत शिवाजीराजे यांची ९७ वी जयंती दि. २५ मे २०२२ रोजी येतअसून त्या निमित्ताने श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठाच्या वतीने दि. १४ ते २५ मे दरम्यान स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

    दि. १४ मे रोजी स्मृती महोत्सवाचे उदघाटन आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार वितरण महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.

   कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी स्मृती महोत्सव आयोजित करण्यात आला नसल्याने गतवर्षी म्हणजे सन २०१८ - २०१९ या वर्षीचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार माजी खासदार, सहकारातील जाणते नेतृत्व कल्लाप्पा आण्णा आवाडे आणि सन २०१९ - २०२० चा पुरस्कार केमिस्ट असोसिएशनचे मार्गदर्शक आ. जगन्नाथ शिंदे यांना जाहीर झाले असून त्यांना या पुरस्काराचे वितरण सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह,  शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप असल्याचे प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी सांगितले.

    रविवार  दि. १५ मे रोजी "छ. संभाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास आणि आजची परिस्थिती" या विषयावर प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील.

   सोमवार दि. १६ मे रोजी प्रेरणा कलामंच, पुणे प्रस्तुत सुवर्ण संगीत मैफल आयोजित करण्यात येणार असून जुनी नवी चित्रपट गीते, सुगम संगीत, भावगीत, अभंग, गझल, लावणी सादरीकरण सानिया पाटणकर, दयानंद घोटकर, कल्याणी देशपांडे हे पुण्याचे कलाकार करणार आहेत.

      मंगळवार दि. १७ मे रोजी "सुंदर मी होणार" या विषयावर सौंदर्य तज्ञ डॉ. गौरी चव्हाण, मुंबई यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी भुलतज्ञ डॉ. सुनिता निंबाळकर या असतील.

      बुधवार दि. १८ मे रोजी "व्यथा माणसांच्या कथा कथनांच्या" या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक आप्पासाहेब खोत यांचे कथा कथन होणार आहे. गुरुवार दि. १९ मे रोजी  "धमाल एका लग्नाची" हा एकपात्री प्रयोग मारुती श्रीरंग करंडे सादर करणार आहेत. शुक्रवार दि. २० मे रोजी विविध संत रचानांवर आधारित अभिनव नृत्याविष्कार नृत्य आराधना हा कार्यक्रम डॉ. स्वाती दैठणकर व सह कलाकार सादर करणार आहेत.

   मंगळवार दि. २४ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी कलावंतांचा कलाविष्कार हा कार्यक्रम आणि बुधवार दि. २५ मे रोजी स्मृती महोत्सव समारोप, बक्षीस वितरण आणि सत्कार तसेच कलाविष्कार कार्यक्रमाचा उर्वरित भाग सादर होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर स्वीकारणार असून आ. दिपकराव चव्हाण, लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

   स्मृती महोत्सवातील दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजित सर्व कार्यक्रम मुधोजी हायस्कूल प्रांगणातील रंगमंचावर दररोज सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहेत. 

    मुधोजी हायस्कूल समोर फलटण नगर परिषदेने कायम स्वरुपी प्रशस्त वाहनतळ उभारला असून तेथे प्रकाश व्यवस्था करण्यात आली असल्याने सर्वांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने तेथे लावावीत. कोणीही रस्त्यावर अथवा मुधोजी हायस्कूल प्रांगणात वाहने आणू नयेत असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी केले आहे.

No comments