Breaking News

ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची बचत आणि जमिनीचा पोत अबाधीत ठेवा : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

दीपप्रज्वलनाने कृषी परिसंवाद व कार्यशाळा उदघाटन करताना श्रीमंत रामराजे, आ. दीपकराव चव्हाण, संजय देसाई वगैरे
Save water and keep soil texture intact through drip irrigation: Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : कृष्णेच्या पाण्यामुळे फलटण तालुक्यातील कायम दुष्काळी पट्टयात ऊसाचे क्षेत्र वाढत असताना त्यामध्ये सुधारित बियाणे, तंत्रज्ञान, अत्याधुनिक औजारे यांचा वापर करण्याची नितांत आवश्यकता नमूद करीत वाढत्या क्षेत्रावर ठिबक सिंचन संचाचा वापर अनिवार्य करुन उपलब्ध पाण्यात अधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्याबरोबर जमिनीचा पोत बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, ऊसाचे क्षेत्र मर्यादित ठेवून त्याजागी कापूस हे पर्यायी नव्हे पूरक पीक घेता आले तर वर्षातून दोन वेळा खात्रीचा पैसा हातात येईल, याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

        महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून फलटण - आसू रोडवर,  अभिराम लॉन्स, अलगुडेवाडी, ता. फलटण येथे आयोजित कापूस परिसंवाद व शेतकरी कार्यशाळा उदघाटन केल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, सातारा जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती संजय देसाई, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी आणि कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

    फलटण तालुक्यात कृष्णेचे पाणी पोहोचल्याने संपूर्ण तालुका बागायत होत असताना त्या पाण्याचा योग्य वापर करुन तालुक्यातील शेतीचे एकरी उत्पादन वाढ, उत्पादित शेतमालाला रास्त दर, कोणत्याही पिकांमुळे किंवा अति पाणी वापराने शेतीचा पोत बिघडणार नाही याची काळजी घेणे, ही आपण सर्वांची जबाबदारी असून त्यादृष्टीने आजची शेतकरी कार्यशाळा अत्यंत महत्वाची असल्याचे स्पष्ट करतानाच २०/२५ वर्षापूर्वी फलटण, बारामती, माळशिरस, पंढरपूर हा भाग उत्तम कापूस उत्पादक क्षेत्र असताना वाढत्या कीड रोगांमुळे हे पीक या भागातून नामशेष झाले, गेल्या ४/५ वर्षांपासून प्रामुख्याने गोखळी, साठे, खटकेवस्टी, ढवळेवाडी, गुणवरे वगैरे भागातील शेतकऱ्यांनी पुन्हा कापूस पीक घेण्यास सुरुवात केली असून त्यांचा अनुभव लक्षात घेऊन संपूर्ण तालुक्यात कापूस लागवडी साठी शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, सुधारित बी टी कॉटन वाण, कीड नियंत्रण, विक्री व्यवस्था, हमी भावाची खात्री समजावून देवून हे पांढरे सोने या भागात उत्पादित करण्याच्या उद्देशाने आजचा परिसंवाद व कार्यशाळा आयोजित केली आहे, उपस्थित शेतकरी बांधवांनी तज्ञ व माहितगार अधिकाऱ्याकडून माहिती घ्यावी, आपल्या शंका बाबत त्यांचेकडून निरसन करुन घ्यावे असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

       शासन आणि व्यक्तिशः आपण स्वतः शेतकऱ्यांना सर्वतोपरी  सहकार्य, मार्गदर्शन करण्यात कोठेही मागे राहणार नाही याची ग्वाही देत ऊस आणि गहू या २ पिकांऐवजी पुन्हा कापूस पीक घ्या ते निश्चित फायदेशीर ठरेल याची ग्वाही देत प्रारंभी प्रायोगिक तत्वावर काही क्षेत्रावर कापूस करा, फायदेशीर ठरले तर पुढच्यावर्षी कापसाखालील क्षेत्रात निश्चित वाढ होईल असे सांगून केवळ ऊस आणि गहू यावर अवलंबून न राहता काही क्षेत्रावर कापूस करा असे पुन्हा पुन्हा आवाहन करीत ऊसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन त्याच्या संपूर्ण गाळपाची व्यवस्थाही आपण श्रीराम आणि साखरवाडी कारखान्याच्या गाळप क्षमता वाढीतून केल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

     शेती क्षेत्र तेच कायम असताना लोकसंख्या वाढत असल्याने शेतीचे विभाजन होऊन कुटुंबाकडील कमी क्षेत्रात प्रपंच चालविताना होणारी ओढाताण त्यामध्ये बदलते हवामान, पावसाची अनिश्चितता, योग्य मार्गदर्शन नसल्याने शेतकरी ऊस, गहू, ज्वारी, बाजरी, भाजीपाला या बाहेर जाऊन अन्य पिके घेण्यास धजावत नाही, तथापि आता कृष्णेचे शाश्वत पाणी, कृषी खात्याच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन, शेतमाल विक्रीसाठी हमी भावाची व्यवस्था करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या जोडीला काही क्षेत्रावर कापूस फायदेशीर पीक प्रयोग म्हणून घ्यावे त्यामध्ये नुकसान निश्चित होणार नाही याची ग्वाही आ. दिपकराव चव्हाण यांनी यावेळी दिली आहे.

       प्रारंभी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात कृषी खात्याच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान, कीड रोग नियंत्रण, सुधारित वाण, बदलत्या हवामानानुसार पीक संरक्षण आणि पिकाची योग्य जोपासना याबाबत घ्यावयाची काळजी याविषयी शेतकऱ्यांना नेहमीच मार्गदर्शन केले जाते, त्यानुसार कापूस पिकाबाबत निश्चित योग्य मार्गदर्शन करुन या भागात कापूस उत्पादन वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

    महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक संजय जाधव यांनी हमी भाव खरेदी केंद्र सुरु करता आले नाही तरी कापूस खरेदी व हमी भावाची खात्री दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कापूस पैदासकार डॉ. राजेंद्र वाघ आणि कापूस सुधार प्रकल्पाचे डॉ. नवनाथ मेढे यांनी कापूस लागण, संगोपन, कीड रोग नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती दिली. 

        समारोप व आभार प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर यांनी केले.  कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यशाळेचे उत्तम नियोजन केले होते.

No comments