हरीष नानांनी निष्ठावंत कार्यकर्ते घडवण्याचे काम केले - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
![]() |
हरीष चंदर काकडे (नाना) यांना मानपत्र देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, बबनराव निकम, माजी नगरसेविका वैशाली चोरमले व इतर |
हरीष चंदर काकडे यांचा ७१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : हरीष काकडे यांना थोरा मोठ्या नेत्यांबरोबर काम करायला मिळाले, ते अनेक वर्षांपासून समाजामध्ये काम करत आहेत. सामाजिक चळवळीत काम करत आहेत. त्यांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. श्रीमंत रामराजे महाराज साहेब १९९१ साली नगरपरिषदेच्या माध्यमातून फलटणच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी फलटणच्या विधायक विकासच्या दृष्टीने, त्या त्या भागात चांगलं काम करण्याच्या दृष्टीने सहकार्य करणार्यांमध्ये नानांचा सिंहाचा वाटा होता. स्वर्गीय डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांचे ते अत्यंत निष्ठावान कट्टर कार्यकर्ते म्हणून माझी त्यांची खऱ्या अर्थाने ओळख झाली.आणि त्याच निष्ठेने आजपर्यंत श्रीमंत रामराजे महाराज साहेबांच्या पाठीमागे त्याच परिसरामध्ये काम करण्यासाठीची ठाम भूमिका त्यांनी घेतली. मध्यंतरीच्या काळात नगरसेवक म्हणून काम करताना सुद्धा आम्ही त्यांना पाहिलं. त्यावेळी श्रीमंत रघुनाथराजे हे नगराध्यक्ष होते. तळागाळातल्या सर्वसामान्यांसाठी अगदी कळकळीने ते प्रश्न मांडायचे. रामराजेंशीसुद्धा त्या प्रश्नांच्या अनुषंगाने वाद झाले असतील.मात्र वाद हे तेवढय़ापुरतेच असायचे आणि स्वत:साठी नसायचे ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असायचे. अशाप्रकारे मी हरीष नानांना अनेक वर्षांपासून ओळखत आहे. सध्या प्रकृती स्वास्थ्यामुळे ते सक्रिय नसतील, क्रियाशील नसतील पण अनेक कार्यकर्ते घडवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झालं असल्याचं आपल्याला दिसून येईल. याठिकाणी आमचे मित्र दत्ता अहिवळे यांनीही बोलून दाखवलं की मी जे घडलोय ते नानांमुळेच घडलोय.अनेक हाडाचे व निष्ठावंत कार्यकर्ते घडवण्याचे काम त्यांनी केले आहे.असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
हरीष चंदर काकडे(नाना) यांच्या ७० व्या अभीष्टचिंतन सोहळ्यामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, संस्थापक चेअरमन संत गजानन महाराज पतसंस्था बबनराव निकम, माजी नगरसेविका वैशाली चोरमले, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, तुकाराम गायकवाड, सुदाम अप्पा मांढरे,नरेंद्र भोईटे उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, नगर पालिकेमध्ये काम करत असताना नगरपालिकेच्या सर्वात तळाचा जो कर्मचारी असतो तो सफाई कामगार त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारा नेता म्हणून नानांना लढताना मी पाहिला आहे. नाना कायम निष्ठेने काम करायचे.
आज मी कोणाचेही नाव घेणार नाही परंतु नेमकी चळवळ कुठल्या दिशेनं जात आहे? याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ती चळवळ योग्य दिशेने जाणे गरजेचे आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण नाव घेतो परंतु आपण त्यांच्या विचारानुसार जगतो का?वागतो का?जातीच्या धर्माच्या पध्दतीने ज्या लढाया सुरू आहेत त्या संपवून समाजाला पुढे नेणारी महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षणाशिवाय पर्याय नाही.आपण शिक्षण घेत नाही असं मला म्हणायचं नाही, परंतु जे शिक्षण घेतोय ते तेवढंसं पुरेसं नाही.आपण शिक्षणाला तेवढं महत्त्व द्यायला तयार नाही. ते आपण देतोय का? याचाही विचार करायला हवा. म्हणून चळवळी पुढे घेऊन जाण्यासाठी नानांसारख्या मार्गदर्शकाची कार्यकर्त्यांची गरज आपल्याला आहे. नाना ७१ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत.त्यांना मी मंगलमय शुभेच्छा देतो.त्यांचे आरोग्य उत्तम राहो आणि नानांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला प्राप्त होवो अशी आशा व्यक्त करतो.
ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यावेळी म्हणाले,"हरीष काकडे हे फक्त आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते नेते नसून ते बहुजन समाजाचे, सर्व गोरगरीब समाजाचे नेते आहेत.हरीषने अनेक वेगवेगळ्या पदांवर काम केले.साहस क्रीडा मंडळाची स्थापना करून त्यामार्फत नावलौकिक मिळवला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसारख्या राष्ट्रीय नेत्याला १९७६ च्या दंगलीच्या वेळी पुनर्वसन करणे हेतू पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना हरीषने निरुत्तर केले. त्यांनी हक्कांसाठी लढा दिला.तेच काम करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ते घडण्याची गरज आहे.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी आपले विचार व्यक्त केले.ते म्हणाले,"आज आपण हरीष च्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी जमलो आहोत. हरिष चा सत्कार विविध ठिकाणी यापूर्वी झालेलाच आहे.त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.फलटण शेतीमाल प्रक्रिया संघाचे ते संचालक आहेत. यशवंत सहकारी बँकेचे संचालक आहेत. नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.त्यामुळे त्यांच्या सत्कारापेक्षा त्यांनी केलेले काम, ती चळवळ पुढे नेण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे.दत्ता अहिवळे सरांनी हरीष च्या मार्गदर्शनाखाली जे काम उभे केले ते दुसरं कोणी करताना दिसत नाही. तेव्हा नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विविध योजना राबवून शाळा,वसतिगृह व विद्यार्थी अभ्यासिका उभा करण्यावर भर द्यायला हवा. तरुण वर्गाने पुढाकार घ्यायला हवा. जयंती मंडळाच्या पत्रकार परिषदेमध्ये तरुण कार्यकर्त्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केले असल्याचे दिसून आले.त्यात शिस्तपालन समिती सुद्धा निर्माण करण्यात आली आहे.त्यामुळे तरुणांच्या कामाचं कौतुक करायला हवे.
यावेळी प्रबुध्द विद्याभवन चे संचालक दत्ता अहिवळेसर यांनी त्यांच्या कामांमध्ये नानांचे मार्गदर्शन कसे मिळाले याविषयी विस्तृत मांडणी केली.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व मान्यवरांच्या हस्ते हरीष चंदर काकडे (नाना) यांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक व वक्ते श्री.नवनाथ कोलवाडकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नवनाथ कोलवडकर यांनी केले तर आभार आनंद काकडे यांनी मानले.
No comments