फापटपसारा नको! तुम्ही माझे पैसे देणे आहे का नाही?- दिगंबर आगवणे ; २३ मार्च रोजी भीक मागो आंदोलन व आमरण उपोषण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ मार्च - मी किती बँकांची कर्ज काढली, त्याला तारण काय दिले, हा माझा व बँकेचा प्रश्न आहे मी व बँक पाहून घेऊ, या प्रकरणात मुद्दा काय आहे, तुम्ही माझे पैसे देणे आहे का नाही? परंतु विनाकारण विषय दुसरीकडे वळवला जातोय, त्याचा फापटपसारा केला जातोय, मला काही विशेषणे वापरायची, अनेकांना बोलवून माझ्यावर केसेस करायला सांगायच्या, माझी बदनामी कशी होईल हे पहायचे, इतकेच नाही तर मला बलात्काराच्या केस मध्ये गुंतवण्या पर्यंत मजल जात आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणात मी व्यथित झालो आहे, माझी मानसिकता राहिली नाही, पण तरीही मला न्याय मिळवण्यासाठी, मी माझ्या २९ मागण्या घेऊन, दि. २३ मार्च २०२२ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते प्रांत कार्यालय फलटण येथपर्यंत भीक मांगो आंदोलन करणार असून, त्यानंतर फलटण प्रांत कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे दिगंबर आगवणे यांनी जाहीर केले आहे.
मागील काही दिवसापासून खासदार रणजितसिंह व दिगंबर आगवणे यांच्यामध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिगंबर आगवणे यांनी २० मार्च रोजी गिरवी येथे पत्रकार परिषद घेऊन खासदारांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत आमरण उपोषणाची घोषणा केली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माझ्याकडे ८ कोटी रुपये असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, परंतु तसे पाहिले तर त्यांनी २५ कोटी रुपयांची मागणी करायला पाहिजी होती, कारण स्वराज कारखान्याकडून बगॅस, प्रेसमड, फर्टिलायझर, साखर या मालांची खोटी बिले माझ्या अकाउंटला मारली आहेत, एकूण ७० हजार टन माल माझ्याकडे पाठवला गेला व त्यापैकी ३५ हजार टन परत नेल्याचे दाखवले आहे, या सर्व प्रकरणात बराच गोलमाल आहे, यामध्ये माझी फसवणूक झाली आहे, याचे सर्व पुरावे देखील मी सादर करू शकतोय. त्यामुळे खासदारांनी माझ्याकडे ८ कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे, ते खोटे असून, असे कोणतेही देणे मी लागत नाही, उलट त्यांच्याकडेच माझे पैसे येणे असल्याचे दिगंबर आगवणे यांनी सांगितले.
खासदारांची या प्रकरणात भूमिका वेगळी दिसतेय कारण मला एक इन्कम टॅक्स नोटीस आलेले आहे, कार्यकर्त्यांना पुढे करून माझ्या विरोधात तक्रारी करायला लावत आहेत, मला वेगवेगळी विशेषणे वापरून बदनाम करतायत. आपले कार्यकर्तेही माझी बदनामी करत आहेत, परंतु त्यांचे बोलवते धनी आपणच आहात, नटवरलाल, भामट्या यासारखी विशेषणं मला वापरत आहात याचा मला खेद होत आहे, ज्या माणसासाठी आयुष्य घालवलं, ज्या माणसासाठी अहोरात्र झटलो, त्या माणसाने अशी विशेषणे मला लावावीत याचे मला मनस्वी दुःख होत आहे, खरं तर मी त्यांना वाहून घेतलं होतं, परंतु आता ते म्हणताहेत की, माझे ८ कोटी रुपये दिगंबर कडे येणे आहे, परंतु मला एकच प्रश्न पडतोय की २५ कोटी रुपयांचा माल स्वराज कारखाना मला एकही पैसा न घेता कसा देऊ शकतो. याचे उत्तर द्यावे. आणि मी जे खासदारांकडे पैसे मागणी करीत आहे ते पैसे २०१५ मध्ये दिले होते आणि ही बिले २०१७-१८ मधील आहेत, २०१५ ला दिलेले पैसे २०१७-१८ मध्ये डिटेन करून ठेवले असे तुम्ही सांगताय ते न पटण्यासारखे आहे. मुळातच तुम्हाला माझी फसवणूक करायची होती, त्यामुळेच हे सर्व केलं असल्याचा आरोप दिगंबर आगवणे यांनी करून, माझ्याकडे एवढे पुरावे आहेत की, ते पुरावे, मी निर्दोष असल्याचे शाबित करतील, आणि खासदार मला देणं असल्याचे सिद्ध करतील असे दिगंबर आगवणे यांनी संगितले, तसेच, खासदारांनी, माझे पैसे द्यावेत, जेणेकरून मी माझ्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर येईन अशी विनंतीही केली आहे.

No comments