दिगंबर आगवणेंकडून फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी ; त्यांना न्याय मिळण्यासाठी उपोषणाला बसणार - अनुप शहा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ मार्च - दिगंबर आगवणे यांच्या विरोधात कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत. वेळ आल्यानंतर आम्हीही पुरावे सादर करणार आहोत. कुणाला शिरवळला फ्लॅट देतो तर कुणाला नांदल येथे प्लॉट देतो म्हणून आगवणेंकडून फसवणूक झाली आहे. दिगंबर आगवणे यांच्याविरुध्द तक्रार केलेल्या तक्रारदारांना न्याय मिळायला हवा. तालुक्यात अशा विविध प्रकारे फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे, त्यांनी धाडसाने पुढे यावे त्यांच्या पाठीशी भाजप ठाम उभी राहणार असून त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्हीही रस्त्यावर उतरत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनुप शहा यांनी दिला आहे.
फलटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शहा यांनी सदर इशारा दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, मराठा क्रांती मोर्चा फलटणचे समन्वयक माऊली सावंत आदींची उपस्थिती होती.
फलटण तालुक्यामध्ये अपुऱ्या बुध्दीमत्तेची विघ्नसंतोषी माणसे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. सुर्यावर थुंकल्यावर थुंकी परत स्वतःच्या तोंडावर पडते हे कोणी विसरु नये. दिगंबर आगवणे यांनी स्वतः खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे लागुन कारख्यान्याच्या कर्जात त्यांना सहकर्जदार करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांना सहकर्जदार करून घेतले होते. पंचायत समिती निवडणूका २०१२ साली झाल्या मग २०१३ साली ॲड जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या निवडणूकीत कसे काय पैसे दिले असा सवालही शहा यांनी यावेळी व्यक्त केला. स्वराज पतसंस्थेचे कर्ज आगवणे यांनी वेळोवेळी लढलेल्या निवडणुकीच्या प्रपत्रात दाखवले आहे. आता कुठेही वाचण्याची शक्यता नाही म्हणल्यावर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. उपोषणाचा मार्ग सत्यासाठी असावा असत्यासाठी नव्हे. सत्यासाठी उपोषण केलं तर समजू शकतो, आम्हीही त्यास पाठींबा देवू. फसवणूक झालेल्या सर्वांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभी आहे. सर्वांना सनदशीर मार्गाने मदत केली जाईल. तक्रारदारांना न्याय देण्यासाठी आम्हीही उपोषणास बसणार आहोत. कायदा सर्वांसाठी समान आहे. दोन्ही उपोषणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर त्याचा विचार पोलिस यंत्रणेने करायला हवा आम्ही नाही असेही शहा यांनी यावेळी सांगितले. दिगंबर आगवणे यांनी कोणाचीही फसवणुक केली असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यालय अथवा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, गटनेते अशोकराव जाधव, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते अथवा माझ्याशी म्हणजेच अनुप शहा यांच्याशी संपर्क साधावा. फसवणुक झालेल्यांचे नाव न जाहीर करता आम्ही त्या फसवणूकदाराना संपुर्ण सहकार्य करू, असेही अनुप शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.
दिगंबर आगवणे हे कायदेशीर कारवाई विशेषतः ॲट्रॉसिटीचा वापर दैनंदिन वापरात करत असतात, आतापर्यंत बऱ्याच केसेस दाखल केलेल्या आहेत. त्यांच्या विरोधात आता मराठा क्रांती मोर्चा तर्फे आम्ही रस्त्यावर उतरत आहोत, असे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments