हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी कृषी महाविद्यालय,पुणे येथे फुले मेटाहायझीमचे उत्पादन सुरू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - पुणे कृषी महाविद्यालयातील आठव्या सत्रातील विद्यार्थी कार्यानुभवात्मक शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रयोगशाळेत राबवत असलेल्या विविध उत्पादन प्रकल्पात प्रत्यक्ष काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. त्यातून हे विद्यार्थी विविध प्रकारची कृषी उत्पादने तयार करण्याच्या शास्त्रीय पद्धती शिकतात.
कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील कृषी कीटकशास्त्र विभागामध्ये विद्यार्थ्यांना विविध जैविक कीडनाशकांची माहिती देऊन प्रत्यक्ष उत्पादनांची संधी दिली जात आहे. विद्यार्थ्याद्वारे तयार केलेली उत्पादने शेतकऱ्यांच्या उपयोगाकरिता विक्रीस उपलब्ध केली जात आहेत. यात फुले मेटाहायझीअम (मेटाहायझीअम अनिसोपली) या जैविक कीटकनाशकाचे उत्पादन व विक्री सुरू आहे. याचा वापर हुमणी अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी केला जातो. या व्यतिरिक्त रस शोषण करणाऱ्या किडे, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे इ. या किडीच्या नियंत्रणासाठी पण केला जातो. रासायनिक कीडनियंत्रण पद्धतीला पर्याय म्हणून फुले मेटाहायझीअम चा वापर होतो. तसेच पुढील काळात एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करून नैसर्गिक समतोल राखण्यास मदत होईल.
जैविक घटकांचे उत्पादन व उपयोग या कार्यानुभवात्मक शिक्षण प्रकल्पाचे व्यवस्थापन डॉ. नजीर तांबोळी, डॉ. गजानन लोळगे, गौरी जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यात अनिकेत वाकळे, नेहा टिळेकर, तुषार शेंडे, तेजस्विनी साबळे, धनंजय थोरात, अस्मिता तोडकर या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी व उत्पादनांचे खरेदी करण्यासाठी डॉ. नजीर तांबोळी (7588680786) यांच्याशी संपर्क साधावा. याची किंमत दोनशे रुपये प्रति किलो (200रु. / प्रति किलो)
प्रमाण - एक किलो फुले मेटाहायझीअम 200 लिटर पाण्यात + 1 लि. दूध मिसळून रस शोषण करणाऱ्या किडीसाठी साध्या पंपाने फवारावे.
- हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी 25 किलो फुले मेटाहायझीअम कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून टाकावे किंवा 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून अळवणी करावी.
No comments