गुणवरे येथे खाजगी सावकारकी ; एकावर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ फेब्रुवारी - मुलीच्या लग्नासाठी व्याजाने दिलेल्या ४ लाख ५० हजार रुपयांच्या मोबदल्यात मुद्दल व व्याज असे तब्बल ४४ लाख रुपयांची मागणी करून, रुपये न दिल्यास, लिहून दिलेली जमिन परत करणार नाही, जमिनीची मागणी केल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी ज्योतीराम संभाजी गावडे रा. गुणवरे ता. फलटण याच्याविरुध्द सावकाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, रविंद्र हरिभाऊ काळे वय ५८ रा. गुणवरे ता. फलटण यांनी मुलीच्या लग्नासाठी २०११ साली ज्योतीराम संभाजी गावडे याच्याकडून साडेचार लाख रुपये दरमहा दहा टक्के व्याज दराने घेतले होते. त्याबदल्यात तारण म्हणून गावडे याने काळे यांची दोन एकर जमिन खुषखरेदी पत्राने त्याच्या नावाने करुन घेतली होती. सदर मुद्दल व त्यावरील व्याज असे संपुर्ण कर्ज फेडल्यानंतर सदर जमिन पुन्हा काळे यांच्या नावाने करुन देण्याचे त्यावेळी ठरले होते. यानंतर सुमारे दीड वर्षांनंतर काळे यांनी गावडे यांच्याकडे जाऊन साडेचार लाख रुपये मुद्दल व त्यावरील व्याज असे पैसे एकरक्कमी देतो, माझी दोन एकर जमिन पुन्हा माझ्या नावे फिरवून द्या असे म्हणाले. त्यावर गावडे याने मुद्दल व त्यावरील व्याज असे सव्वीस लाख रुपयांची मागणी केली. त्यावर काळे यांनी एवढे व्याज होत नसल्याचे सांगत १८ महिन्यांमध्ये कर्जाच्या मुद्दलेच्या तिप्पट म्हणजे बारा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवीली. परंतू त्याने काळे यांचे न ऐकता सव्वीस लाखांची मागणी केली. यानंतर दोन फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुणवरे ता. फलटण येथील नाळेवस्ती येथे गावडे यास त्याच्याकडुन बेकायदेशीरपणे घेतलेल्या साडेचार लाखाच्या मोबदल्यात, त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुद्दल आणि व्याज मिळुन सव्वीस लाख रुपये देण्यास आपण तयार असल्याचे सांगुन, आपली जमीन फिरवुन पुन्हा माझ्या नावे करुन देण्यास सांगितले. परंतू सव्वीस लाख रुपये २०१३ सालापर्यंतचे होते. आता चव्वेचाळीस लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा जमिन परत मिळणार नाही असे सांगितले. सदर चव्वेचाळीस लाख रुपये न दिल्यास जमिन परत करणार नाही व पुन्हा जमिन मागितल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली, अशी फिर्याद रविंद्र हरिभाऊ काळे यांनी पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. त्यानुसार ज्योतीराम संभाजी गावडे याच्याविरुध्द सावकारी अधिनियमान्वये फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. अरगडे करीत आहेत.
No comments