Breaking News

पंतप्रधान 15 जानेवारी रोजी स्टार्टअपशी संवाद साधणार

The Prime Minister will interact with the startup on January 15

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022
    पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता स्टार्टअप्सशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग 4.0, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी होतील. 150 हून अधिक स्टार्टअप्सची ग्रोइंग फ्रॉम रूट्स; डीएनए विषयक माहिती; स्थानिक ते जागतिक; भविष्यातील तंत्रज्ञान; उत्पादन क्षेत्रात जगज्जेते घडवणे आणि शाश्वत विकास या संकल्पनांवर आधारित सहा कार्यकारी गटांमध्ये विभागणी केली गेली आहे. प्रत्येक गट त्यांना दिलेल्या संकल्पनेवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण करेल. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश आहे.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, 10 ते 16 जानेवारी 2022 दरम्यान, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे "सेलिब्रेटिंग इनोव्हेशन इकोसिस्टम" हा आठवडाभर चालणारा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या 6 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला आहे.

    स्टार्टअप्सच्या देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या क्षमतेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या शुभारंभात हे प्रतीत झाले. सरकारने स्टार्टअपच्या वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्यावर काम केले आहे. याचा देशातील स्टार्टअप परिसंस्थेवर उत्तम परिणाम झाला आणि त्यामुळे देशात युनिकॉर्नची आश्चर्यकारक वाढ झाली आहे.

No comments