Breaking News

खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगदा अंतिम खुदाईद्वारे खुला करण्यास प्रारंभ

New six-lane tunnel in Khambhatki Ghat begins to be opened by final excavation

     सातारा  : राज्यातील पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 4( नवा राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याचे (प्रत्येकी 3 मार्गिका असलेल्या जुळया बोगद्याचे) अंतिम खुदाईद्वारे खुलेकरणाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाले.

     यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार जयंत आसगांवकर,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    श्री. गडकरी म्हणाले, खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. वेळेची व पैशाची बचत होणार आहे. पुणे ते सातारा महामार्गाचे काम तीन महिन्यात पूर्ण होईल. पुणे ते बंगळूर सहा लेनचा नवीन ग्रीन फील्ड महामार्ग बांधण्यात येणार आहे. या ग्रीन फील्ड महामार्गालगत नवीन शहरे निर्माण करावेत.  त्यामुळे मुंबई व पुणे शहरावरील शहरीकरणाचा भार कमी होईल. सातारा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा विकास होण्यास या महामार्गाचा उपयोग होईल. त्याचबरोबर राज्याच्या विकासालाही गती मिळेल. उत्तर भारतातील वाहतूक मुंबई पुणे न जाता सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूरमार्गे दक्षिण भारतात जाण्यासाठी नवीन महामार्ग करीत असल्याचेही श्री.गडकरी यांनी यावेळी सांगितले.

    पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, खंबाटकी घाटात नेहमी वाहतूकीची अडचण होत होती. परंतु या नवीन सहा मार्गिकामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सोयीची होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतूक व अन्य वाहतुकीला फायदा होणार आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी हा राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा आहे.

    खंबाटकी घाटात नवीन सहापदरी बोगदा (प्रत्येकी तीन पदरी दुहेरी बोगदा) - सदरील बोगद्याच्या ॲप्रोचेस चे काम वेळे येथून किमी 771.730 येथे सुरु होते आणि खंडाळा किमी 782.000 येथे समाप्त होते. बोगद्याच्या प्रत्येक ट्यूबमध्ये 10.5 मीटर रुंदीच्या कॅरेजवेसह तीन पदरी आहेत. बोगद्याची एकूण अंतर्गत रुंदी सर्वसाधारणपणे 16.16 मीटर (कमाल) आहे. कॅरेजवेच्या वरच्या काउन पर्यंत बोगद्याच्या आतील उभा क्लिअरन्स 9.31 मीटर आहे आणि किमान 5.5 मीटर उभा क्लिअरन्स आहे. बोगद्यामधील रस्ता सिमेंट क्राँक्रीटचा आहे. बोगद्याची लांबी 1148 मीटर आहे. अडचणीच्या काळात दोन्ही बाजूच्या बोगद्यातून वाहतूक वळविण्यासाठी सिंगल लेन क्रॉस पॅसेज बोगदे 400 मीटर अंतरावर 5.5 मीटर कॅरेजवेसह बनविण्यात येत आहेत.

No comments