Breaking News

क्रिकेट हा करिअर ओरिएंटेड खेळ ; मुलांसह मुलींनीही चांगल्या दर्जाचे क्रिकेटर व्हावे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

Cricket is a career oriented sport - Ramraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - क्रिकेटसाठी घरची श्रीमंती असावी असे काही नाही, सर्वसाधारण घरातूनही चांगले क्रिकेट खेळून, खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत. यासाठी चांगले क्रिकेट खेळले पाहिजे,  आपल्याकडे क्रिकेट नाही असे मला म्हणायचे नाही, पण खेळाडूंना दर्जेदार क्रिकेट मिळाले पाहिजे. मुलांना या वयात योग्य कोचिंग मिळाले तर चांगले करिअर क्रिकेटमध्ये होऊ शकते, क्रिकेट हा करिअर ओरिएंटेड खेळ आहे, त्यामुळे मुलांसह मुलींनीही याकडे लक्ष द्यावे व चांगले क्रिकेट आत्मसात करून, चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळाडू व्हावे असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी  केले.

    फलटण येथे श्रीमंत रामराजे क्रिकेट ॲकॅडमीचे उदघाटन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले, या प्रसंगी श्रीमंत रामराजे  बोलत होते. यावेळी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, डी.के.पवार, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, अनिल जाधव, बापुराव गावडे, ऋतुराज भोईटे, महाराष्ट्र  क्रिकेट अंपायर असोसिएशनचे माजी अध्यक्ष सदानंद प्रधान, क्रिकेट प्रशिक्षक इस्माईल शेख, पत्रकार सुभाष भांबुरे, अ‍ॅड.रोहित अहिवळे उपस्थित होते.

    मुलांना योग्य प्रकारे कोचिंग व क्रिकेटचा सराव दिला, तर त्यातून चांगले खेळाडू तयार होतील. ज्यांचा नैसर्गिक खेळ चांगला आहे, म्हणजे ज्यांना बॉल सेन्स आहे, अशा खेळाडूंनी टेक्निकल कोचिंग घेऊन,  चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळून, एक दर्जेदार क्रिकेटर व्हावे, त्यासाठी आपण खेळाडूंना तसेच क्रिकेट अकॅडमीला लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.

    मुलींसाठी क्रिकेट कोचिंग सुरू करण्याचा माझा मानस आहे, मुलींना आता मागे ठेवून चालणार नाही, आपल्या भागातून मुली क्रिकेटर म्हणून पुढे आल्या पाहिजेत, तसा प्रयत्न क्रिकेट अकॅडमी व खेळाडूंनी करावा अशी अपेक्षा यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली व फलटण मध्ये सुरू करण्यात आलेल्या क्रिकेट ॲकॅडमीच्या निमित्ताने आज आपले स्वप्न साकार होत असल्याचे सांगून, याबद्दल संयोजकांचे आभार मानले.

    श्रीमंत रामराजे क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते  विकेटचे पूजन करून करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्रीमंत रामराजे क्रिकेट ॲकॅडमीचे अध्यक्ष मिलिंद सहस्त्रबुद्धे व सोमनाथ चौधरी यांनी केले.   प्रस्तावना व सूत्रसंचालन मदने सर यांनी केले. कार्यक्रमास समीर तांबोळी, राजू रुपनवर, धनंजय पवार, रणजीत खानविलकर , नितीन डींग्रे, अमोल पवार व फिरोज शेख उपस्थित होते.

    श्रीमंत रामराजे क्रिकेट अकॅडमीसाठी  प्रशिक्षक म्हणून सोमनाथ चौधरी, मदने सर, शाहीर शेख, मिलिंद चौधरी हे प्रशिक्षण देणार आहेत तर सदानंद प्रधान सर, इस्माईल शेख, मिलिंद सहस्त्रबुद्धे हे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत.  

No comments