Breaking News

फलटण तालुक्यात अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु

Punchnama started due to untimely rains in Phaltan taluka

 फलटण  : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन सोमवार दि. ६ नोव्हेंबर पर्यंत स्वयंस्पष्ट अहवाल तयार करण्याचे स्पष्ट निर्देश प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संबंधीत यंत्रणेला दिले आहेत.

       फलटण तालुक्यात डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापासून हवामान बदल, थंड वारे आणि पाऊस सुरु झाल्याने, तसेच गुरुवार दि. ३ रोजी सुमारे ८५ मि. मी. पाऊस झाल्याने शेतातील उभी पिके विशेषतः कांदा, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

    ऊस तोडणी वाहतूक मजुरांच्या झोपड्या उध्वस्त झाल्याने त्यांना शाळा, मंदिरात निवारा शोधावा लागल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले तसेच या मजुरांसह नेहमीच्या शेत मजुरांनाही रोजगार बंद झाल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.

    प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी तहसीलदार समीर यादव, उपविभागीय कृषी अधिकारी कोळेकर, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे महसूल मंडलाधिकारी, तलाठी, कृषी मंडलाधिकारी, कृषी सहाय्यक वगैरे अधिकाऱ्यांच्या बैठकीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

No comments