Breaking News

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा सदैव प्रेरणा देत राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली

Krantisinha Nana Patil's fight for independence will always inspire

    मुंबई, दि. ५ :- संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. क्रांतिसिंहांनी देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात दिलेले योगदान तसेच देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव  प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

    क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, क्रांतिसिंह नाना पाटील खऱ्या अर्थानं ‘क्रांतिसिंह’होते. महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरु केलेल्या असहकार चळवळीपासून इंग्रज सत्तेला आव्हान देणाऱ्या ‘प्रतिसरकार’आंदोलनापर्यंतचा त्यांचा लढा भारतीय स्वातंत्र्यचळवळीत सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला इतिहास आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर भागातल्या दीड हजार गावात ‘प्रतिसरकार’च्या माध्यमातून त्यांनी लोकन्यायालये, बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा निर्माण केली होती. गावगुंड, समाजकंटकांवर वचक निर्माण केला होता. हे इंग्रज सरकारविरोधातलं मोठं धाडस होतं. स्वातंत्र्य लढ्याबरोबरंच त्यांनी देशाच्या जडणघडणीत योगदान दिलं. शिक्षणप्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, अनिष्ठ रुढी-परंपरांवर बंदी यासाठी प्रबोधनाचे कार्य केले. स्वातंत्र्यलढ्यासह देशाच्या जडणघडतीतील योगदानामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं स्थान आपल्या सर्वांच्या मनात कायम वरचं असेल व ते सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना आदरांजली वाहिली.

No comments