Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांच्या जाती प्रमाणपत्र पडताळणीचे विशेष मोहिमेचे नियोजन

Planning of special campaign for verification of caste certificates of Gram Panchayat General Election 2020 candidates

     सातारा दि. 6 (जिमाका) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० अंतर्गत निवडून आलेल्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र विहीत कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा यांचेमार्फत ज्या विजयी उमेदवारांना समितीकडून अद्याप जाती पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. अथवा समितीद्वारे कळविण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता अजूनही अर्जदार यांच्याकडून करण्यात आलेली नाही किंवा निवडणूक निकालानंतर ज्या विजयी उमेदवारांनी निवडणूक जाहीरनामा अद्याप समिती कार्यालयास सादर केला नाही. अशा प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी  खालील दिनांका दिवशी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

     सातारा व जावली दि. 7 ऑक्टोबर 2020.  फलटण व कोरेगांव दि. 8 ऑक्टाबर, वाई, महाबळेश्वर व खंडाळा दि. 11 ऑक्टोबर, माण  व खटाव दि. 12 ऑक्टोबर , कराड व पाटण दि. 13 ऑक्टोबर 2021.     तरी संबंधित विजयी उमेदवार, अर्जदार यांनी आपल्या तालुक्यास निश्चित केलेल्या दिनांकास जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा येथे समक्ष उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी. जात वैधता प्रमाणपत्राअभावी एखाद्या उमेदवाराचे सदस्यत्व रद्द झालेस त्यास समिती कार्यालय जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद  घ्यावी.

    अर्जदार यांनी येताना पुढील  कागदपत्रे, शालेय - महसुली जातनोंद पुरावे सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र,  अर्जदाराचे शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराचे वडीलांचे शाळा सोडल्याचा दाखला,  अर्जदाराचे आजोबांचे शाळा सोडल्याचा दाखला,  मानीव दिनांकापूर्वीचे जात व सातारा जिल्ह्यातील स्थायी वास्तव्याचे शालेय, महसूली पुराव्यांची साक्षांकित प्रत, (अनुसूचित जातीसाठी मानीव दिनांक १० ऑगस्ट १९५० / विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी मानीव दिनांक २१ नोव्हेंबर १९६१ व इतर मागासवर्ग - विशेष मागास प्रवर्ग यांचेसाठी मानीन दिनांक १३ ऑक्टोबर १९६७ या दिनांकापूवीचे जात नोंद असलेले पुरावे),  पुरावे सादर करतेवेळी सर्व मूळ कागदपत्रे दाखविणे व त्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

       तरी   दिलेल्या दिवशी नमूद तालुका कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत उमेदवार, अर्जदारांनी  वेळेत उपस्थित राहून समितीस सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती स्वाती इथापे, उपायुक्त  तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.

No comments