Breaking News

उपनगराध्यक्ष केबिन वापराच्या निषेधार्थ अनुप शहा यांनी केली मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कामकाजाला सुरुवात

Anup Shah started work in the office of the Chief Officer

    फलटण - (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 6 ऑक्टोबर -  उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होई पर्यंत उपनगराध्यक्षांची केबिन कोणालाही वापरण्यास देऊ नये, ती बंद ठेवावी अशी मागणी  नगरसेवक अनुप शहा यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने फलटण नगर परिषद उपनगराध्यक्ष यांचे दालन बंद करण्याबाबत मुख्याधिकारी यांनी कारवाई करुन तसे लेखी पत्र दिलेले असताना देखील  आज पुन्हा सत्ताधारी नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी उपनगराध्यक्ष यांच्या दालनाचा वापर  केल्याच्या निषेधार्थ नगरसेवक अनुप शहा यांनी सरळ मुख्याधिकारी यांच्या दालनात बसून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे व भेटी गाठीची कामकाज सुरू केले.

    फलटण नगर परिषद येथे मुख्याधिकारी हे प्रशासकीय अधिकारी असून त्यांनी उपनगराध्यक्ष यांचे दालन बंद केलेले असताना, आज पुन्हा सत्ताधारी नगरसेवक गुंजवटे यांनी उपनगराध्यक्ष पदाचे खुर्चीवर बसून कामकाज सुरू केले.  मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र देऊन सुद्धा जर सदरचे दालन बंद करण्यात येत नसेल, मुख्याधिकाऱ्यांच्या पत्राला जर किंमत नसेल आणि कुणीही कुणाचे दालन वापरायचे असे जर ठरले असेल, तर आज मी उपनगराध्यक्ष केबिन बेकायदेशीर वापराच्या निषेधार्थ, फलटण नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून  नागरीकांची कामे, प्रश्न व अडीअडचणी सोडविण्याचे काम आजपसून सुरू करत असल्याचे अनुप शहा यांनी सांगितले.

No comments