Breaking News

मोदी - शहा यांचे सरकार उलथवून टाका - श्रीमंत संजीवराजे ; फलटण बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Phaltan closed in protest of brutal killing of farmers at Lakhimpur Khiri

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ ऑक्टोबर - राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर अनेक जणांनी भुवया उंचावल्या, परंतु शेतकऱ्यांना चिरडणारे सरकार असेल तर सर्वांनी एकत्र आल्या शिवाय पर्याय नाही, त्यामुळेच राज्यात महाविकास आघाडी एकत्र आली आहे. केंद्रात वाजपेयी पंतप्रधान  होते त्या वेळी भाजपचे सरकार होते, परंतु सध्याचे सरकार हे भाजपचे नसून मोदी -  शहाचे सरकार आहे, हे सरकार आपल्याला उलथवून टाकावे लागणार आहे, एकीकडे हे सरकार शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहे  तर दुसरीकडे महागाई वाढवून सर्वसामान्यांवर अन्याय करत असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

    उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीने आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती. त्यानुसार फलटण शहरातही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर - निंबाळकर, नगराध्यक्षा सौ.नीता मिलिंद नेवसे,  डी. के. पवार, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी - बेडके, फलटण तालुका शिवसेना प्रमुख प्रदीप झणझणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुरवातीस महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी घटनेतील शेतकऱ्यांना आदरांजली वाहून केंद्र सरकारचा निषेध केला.

फलटण : निषेध मोर्चा प्रसंगी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    पुढे बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले, केंद्राने केलेल्या शेतीविषयक कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले, या कायद्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होणार असल्यामुळेच शेतकऱ्यांनी  पोटतिडकीने हे आंदोलन चालू ठेवले आहे, गेली दोन वर्षांपासून आंदोलन चालू आहे, आणि सरकारने या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला. राजकीय आंदोलन हे एक ते दोन दिवसाचे असते पण हे बळीराजाने केल्या असून हे आंदोलन गेल्या दोन वर्षापासून चालू आहे. त्यामुळे सरकार अस्वस्थ आहे, आणि हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे, शेतकऱ्यांचे आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने चिरडण्याचा प्रयत्नही झाला. शेतकऱ्यांचे आंदोलन कुठल्याही मार्गाने मोडीत  निघत नाही, हे सरकार व गृहमंत्री यांना समजले.  पण कशाही पद्धतीने आंदोलन मोडले  पाहिजे हे त्यांच्या मनात असणारे स्वप्न, गृहमंत्र्यांच्या मुलाने सत्यात उतरवले. आणि लाखीमपूर येथे जमलेल्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले. त्यामुळेच आता स्वातंत्र्यासाठी लढावे लागते काय अशी भावना निर्माण होणे साहजिकच आहे. आणि शरद पवार साहेबांनी तसे बोलून दाखवले त्यात चुकीचे काय आहे असा सवाल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केला.

      सरकारच्या विरोधात जो जाईल त्याच्याविरोधात आयटी, ईडी सोडायची,कारवाई करायची.  त्याच्या नातेवाईकांवर कारवाई करायची अशा स्वरूपाच्या कारवाया भाजपाने सुरू केलेल्या आहेत, असले राजकारण कधीही आपण पाहिले नाही, भाजपा करत असलेले राजकारण हे खालच्या थराचे राजकारण असल्याची टीका श्रीमंत संजीवराजे यांनी केली.

    केंद्र सरकारच्या जाचक कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना केंद्र सरकारकडून अशा प्रकारे अत्यंत निर्दयीपणे शेतकऱ्यांचे हत्याकांड  होत असेल तर शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाविरोधात संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील. त्याचाच भाग म्हणून आजचा बंद पाळण्यात येत असल्याचे  आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. 

फलटण : निषेध मोर्चा प्रसंगी बोलताना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

    या सरकारच्या विरोधात बोलले की त्याच्याविरोधात ईडीला, आयटी ला हाताशी धरून त्याला बदनाम करायचे, त्याच्या विरोधात कारवाई करायची, अशी मोहीम या सरकारने सुरू केली आहे, भाजपमध्ये सध्या लोकशाहीचा आवाज दाबण्याची मोहीम सुरू आहे.  नेते मंडळींना बदनाम करायचे ज्या नेतेमंडळीं पासून सत्तेला धोका आहे, त्या नेत्यांना बदनाम करायचे अशी मोहीम भाजपने सुरू केली आहे. फाजील लोकशाही माजवलेल्या, उन्मत्त हुकूमशहाच्या  विरोधात आपल्याला लढावे लागणार आहे, आपल्याला पुन्हा स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल, नाहीतर मोजक्या उद्योगपतींच्या  ताब्यात हा देश जाईल, हा हुकूमशहा  सर्व देश विक्री करायला निघाला आहे, याला थांबवावे लागणार आहे, त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायला लागणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

No comments