Breaking News

शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करावी – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

Action should be taken against those who demand money from farmers for sugarcane harvesting - Balasaheb Patil

    मुंबई  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी करून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे.

    सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, ऊस पीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करुन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास ती रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकारच्या गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. तसेच कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन/व्हॉटसॲप क्रमांक जारी करावा व याबाबतची माहिती शेतकऱ्यांना होण्याकरिता प्रसिद्धी द्यावी.

    सर्व सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांचे व्यवस्थापक/मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तक्रार निवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल क्रमांक यांची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये दर्शनी ठिकाणी व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. तसेच प्रसिद्धीमाध्यमांद्वारे व्यापक स्वरूपात प्रसिद्ध करावी.

    शेतकऱ्यांची लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याच्या शेती अधिकारी यांचेकडे आल्यानंतर त्यावर लगेच कार्यवाही करावी. तसेच तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या ईमेलचा वापर करावा. तक्रारीमध्ये आर्थिक पिळवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव व वाहन क्रमांक नमूद करावा.

    अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर चौकशी करून तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास सदरची रक्कम संबंधित मुकादम / कंत्राटदार यांचे बिलातून वसूल करून संबंधित शेतकऱ्यास अदा करावी, याची जबाबदारी तक्रार निवारण अधिकारी यांच्यावर सोपविण्यात यावी, असे निर्देशही श्री.पाटील यांनी दिले.

    अशा प्रकारची एकही तक्रार चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापक/ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. तसेच राज्यात चालू 2021-22 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता असल्याने व इथेनॉल उत्पादनाकरिता साखर वळविली जाणार असल्याने शेतक-यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत घाबरुन जाऊ नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाचे संदर्भात नियमितपणे आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत.

No comments