लाडक्या बाप्पांना निरोप! भावपूर्ण वातावरणात फलटण येथे गणपती विसर्जन
![]() |
| क्रेनच्या सहाय्याने गणेशमूर्ती विसर्जित करताना फलटण नगर पालिकेचे कर्मचारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने नियमांचे पालन करत पण भक्तिभावाने पूजा, आरती करत साजरा करून, आपल्या लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरण गणेश भक्तांनी निरोप दिला व पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी केली.
फलटण शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११० सार्वजनिक व सुमारे ७ हजार घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यापैकी ७७ सार्वजनिक मंडळे फलटण शहरातील असून बहुसंख्य मंडळांनी क (रविवारी) दुपारी ३ वाजेपर्यंत मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत, कोणत्याही वाद्यांशिवाय विसर्जन मिरवणूका काढल्या तर उर्वरित मंडळांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत मिरवणूका काढून नीरा उजवा कालव्यामध्ये पंढरपूर, बारामती व जिंती पूल येथे विसर्जन केले. तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, ठाकुरकी, झिरपवाडी येथील मंडळांनी स्थानिक व्यवस्थेनुसार गणेश मूर्तीचे विसर्जन केले.
७ हजार घरगुती गणेश मूर्तीपैकी काहींचे ३ ऱ्या दिवशी, काहींचे ५ व्या दिवशी, तर उर्वरित रविवारी विसर्जन केले. घरगुती मूर्तीसाठी नगर परिषदेने नीरा उजवा कालव्या लगत यशवंतराव चव्हाण हायस्कुल समोर, प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन आणि कासार बावडी येथील विहिरीत विसर्जन व्यवस्था केली होती, तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून शहराच्या काही भागातून गणेश मूर्ती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती.
तालुक्याच्या ग्रामीण भागात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१८ व लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८१ अशा एकूण २९९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन परंपरागत ठिकाणी तेथील व्यवस्थेनुसार शांततेत करण्यात आले. तर घरगुती सुमारे १० हजारावर गणेश मूर्ती काहींनी ३ ऱ्या, काहींनी ५ व्या दिवशी आणि उर्वरित काल रविवारी करण्यात आले. शहर व तालुक्यात गणेशोत्सव आणि गौरींचे स्वागत परंपरागत पद्धतीने भक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आले, मात्र त्यावर कोरोनाचे सावट असल्याने उत्साहाला मर्यादा होत्या.
![]() |
| लाईफ जॅकेटसह लाईफ राफ्ट उपलब्ध करण्यात आली होती |
तिसऱ्या दिवशी गणेश विसर्जनासाठी नीरा उजवा कालव्यावर गेलेल्या गणेश भक्तांना तेथे अस्वच्छता आढळून आल्याने त्यांच्या सुचनेनंतर नगर परिषद मुख्याधिकारी संजय गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेश विसर्जनासाठी निश्चित केलेल्या सर्वच ठिकाणांची स्वच्छता करुन घेण्याबरोबर विशेषतः कासार बावडी येथे संरक्षणासाठी उत्तम बॅरिगेटिंग करुन घेतले तर नीरा उजवा कालवा पुलावर मोठ्या गणेशमूर्ती विसर्जन करणेसाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती, रुग्णवाहिका व तातडीच्या वैद्यकीय उपचाराची सोय तसेच उत्तम जलतरण पटू आणि लाईफ जॅकेटसह अन्य व्यवस्था करण्यात आली होती मुख्याधिकारी संजय गायकवाड व त्यांच्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी यावर्षी विशेष लक्ष दिल्याचे दिसून आले.
उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय गोडसे व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी, पोलीस पाटील, महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी शहर व तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त नियुक्त केला होता, तथापी कोठेही अनुचित प्रकार न होता संपूर्ण गणेशोत्सव शांततेत व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, नगर परिषद मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भारत किंद्रे, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांनी गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी व गणेशोत्सवा दरम्यान सतत सर्व संबंधीतांच्या बैठका घेऊन उत्तम नियोजन केले होते.




No comments