Breaking News

शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आसले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Funeral of Shahid Veer Jawan Somnath Mandhare at Asale 

    सातारा, दि. 20 (जिमाका):  शहीद वीर  जवान सोमनाथ मांढरे  यांच्या पार्थिवावर  आसले ता. वाई येथे  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    यावेळी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, माजी आमदार मदन भोसले, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, वाई पंचायत समितीच्या सभापती संगिता चव्हाण यांनी शहिद जवान सोमनाथ मांढरे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. 

    शहीद जवान सोमनाथ मांढरे यांचे आसले गावातून लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. ' अमर रहे अमर रहे सोमनाथ मांढरे अमर रहे, भारत माता की जय,' अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी  पोहचली. 

    यावेळी पालकमंत्री श्री. पाटील, आमदार श्री. पाटील, अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी मांढरे यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.

       पोलीस व  सैन्य दलाच्या  जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली.  यानंतर भाऊ राहूल, पत्नी प्रियंका, मुलगा यश व मुलगी आराध्या (वय 10 महिने) यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. शहीद सोमनाथ मांढरे  यांचा मुलगा यश यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. 

    यावेळी  लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि  ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments