पेरणीपुर्वी बियाणांवर जैविक - रासायनिक प्रक्रिया केल्यास त्याचा उत्पादन वाढीस फायदा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -: शेतक-यांनी पेरणीपूर्वी बियांण्यावर जैविक व रासायनिक प्रक्रिया केल्यास त्याचा उत्पादन वाढीस मोठा फायदा होतो, असे प्रतिपादन शेख कौसर मुस्ताक यांनी फलटण तालुक्यातील खडकी येथे बोलताना केले.
तालुक्यातील खडकी येथे महात्मा फुले कृषी विदयापीठ राहूरी यांना संलग्न असलेले डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन अकॅडमी मुंबई, पदमभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविदयालय, आंबी तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विदयमाने कृषिकन्यांकडून शेतक-यांना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रगतशील शेतकरी व सरपंच सुळ प्रकाश बबन, सरक बाळासो नारायण, कोकरे सिताराम राघू, कोकरे नवनाथ शिवाजी, कर्णवर रामचंद्र जिजाबा, कर्णवर अक्षय संजय, जाधव नाना तानाजी, कोकरे, सुवर्णा सिताराम, कोकरे कलूबाई राघू यांच्या सह शेतकरी पुरुष व काही महिला देखील उपस्थित होत्या.
यावेळी शेतक-यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देणा-या कृषिकन्या शेख कौसर मुस्ताक यांनी जैविक व रासायनिक बीज प्रकिया शेतक-यांसाठी कशी उपयुक्त आहे. याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करताना सांगीतले की, शेतीमध्ये रोज वेगवेगळे नविन बदल आणि संशोधन होत आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी नविन बदल स्विकारून त्याप्रमाणे शेती करण्याची आवश्यकता आहे. आपण कोणत्याही पिकांची पेरणी करण्यापूर्वी बियाणे बाजारामधून विकत घेतो किंवा काही शेतकरी घरी बियाणे तयार करतात तर या बियाणांवर पेरणीपूर्व प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. ही प्रक्रिया आपण जैविक व रासायनिक पध्दतीने करू शकतो. यावेळी बियाणांवर जैविक पध्दतीमध्ये द्रवरूप खतांचा वापर कसा करावा, हे उडीद बियाणांवर प्रयोग करून दाखविले. याशिवाय मका बियाणांवर बुरशीनाशक पावडर याचा वापर कसा करावा याबद्दल शेतक-यांना प्रशिक्षण दिले.
यावेळी त्यांनी सांगीतले की, बियाणांवर प्रक्रिया करून पेरणी केल्यास जैविक व रासायनिक दोन्ही प्रकारांमध्ये पिकांची उगवण क्षमतेमध्ये वाढ होऊन, शेतक-यांचे १० ते १५ टक्के उत्पादन वाढ होते. यामुळे यापुढील काळात बियाणे थेट पेरणी न करता त्यावर प्रक्रिया करून मगच पेरणी करावी, असे कौसर शेख यांनी सांगीतले. तसेच ज्यावेळी शेतक-यांना माती परिक्षणाची शास्त्रीय पध्दत, मातीचे नमुने घेणे, बीजप्रकिया, चारा प्रक्रिया जनावरांची पावसाळ्यात घ्यावयाची काळजी, जनावरांचे लसीकरण, सेंद्रिय शेती, एकात्मिक किड व रोग नियंत्रण या विषयांवर देखील सविस्तर मार्गदर्शन केले.
या शिवीरासाठी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.बी.व्ही.खोब्रागडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments