Breaking News

कोविड काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

'Mission Vatsalya' to raise the living standard of widows of Kovid period - Adv. Yashomati Thakur

    मुंबई  -: कोविड काळामध्ये ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील अनेक महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला अशा काळात या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

    राज्यात गेल्या दीड वर्षात ग्रामीण भागामध्ये कोविडमुळे कर्ता पुरुष गमावल्याने अनेक महिलांना वैधव्याला सामोरे जावे लागले आहे. कोविड – 19 मुळे मार्च 2020 नंतर विधवा झालेल्या महिलांची संख्या 15 हजाराहून अधिक आहे. त्यापैकी जिल्हा कृती दलाकडे यादी तयार असलेल्या महिलांची संख्या 14 हजार 661 आहे. अशा महिलांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना लागणारी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 18 विविध सेवा देण्याचा प्रयत्न महिला आणि बाल विकास विभागामार्फत सुरू आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेपासून अनेक योजनांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील या महिलांसाठी घरकुल योजनेतही कशा पद्धतीने लाभ देता येईल याबाबत या ‘वात्सल्य मिशन’ अंतर्गत काम सुरू असल्याचेही ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

    महिला आणि बाल विकास विभागाचे कर्मचारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, स्थानिक युनिट अधिकारी आणि कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांना या सेवांचा लाभ दिला जात आहे. त्याबाबतची माहितीही दिली जात आहे आतापर्यंत राज्यात सुमारे साडेदहा हजार महिलांपर्यंत विभाग पोहोचला असून लवकरच त्यांना विविध लाभ मिळतील असा विश्वासही ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

या मोहिमेअंतर्गत दाखल अर्जांची संख्या :

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी8 हजार 661 अर्ज

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभासाठी405 अर्ज

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी71अर्ज

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळावा यासाठी1हजार 209 अर्ज

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेसाठी तीन अर्ज

याप्रमाणे‘मिशन वात्सल्य’अंतर्गत आतापर्यंत 10349 महिलांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याकडून अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत.

No comments