Breaking News

परफ्युम क्षेत्रातील दृष्टिहीन स्नातकांच्या यशाचा सुगंध सर्वत्र दरवळावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

The fragrance of success of blind graduates in perfume sector should be everywhere: Governor Bhagat Singh Koshyari

    मुंबई  - दृष्टिहीन विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांइतकेच प्रतिभावंत असतात. आज अनेक क्षेत्रांत दृष्टिहीन तसेच दिव्यांग विद्यार्थी सर्वसाधारण विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. अशा वेळी त्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत असे सांगताना परफ्युम क्षेत्रातील दृष्टिहीन स्नातकांच्या यशाचा सुगंध सर्वत्र दरवळावा अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.

    नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) द्वारा संचालित परफ्युमरी कॉलेजचा पहिला पदवीदान समारंभ  राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व सीपीएल ऍरोमा कंपनी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला 2 वर्षांच्या ‘सुगंधी द्रव्य पदविका’ अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या 17 स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदविका प्रमाणपत्र देण्यात आली.

    ब्रेल लिपीचा शोध लागणे ही दृष्टिहीन व्यक्तींच्या उत्थानासाठी अतिशय महत्त्वाची घटना होती असे सांगून तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज अनेक क्षेत्रात दृष्टिहीन लोक आत्मनिर्भर झाले आहेत.  सुगंधी द्रव्य क्षेत्राप्रमाणेच इतर अनेक क्षेत्रात दृष्टिहीन विद्यार्थी आपली क्षमता सिद्ध करतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. नॅब संस्थेच्या कार्याला मदत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.

    सहानुभूती नको, समान संधी हवी

    नॅब ही राष्ट्रीय संस्था नर्सरी ते वृद्धाश्रमापर्यंत सर्व वयोगटाच्या दृष्टिहीन लोकांसाठी काम करीत असल्याचे मानद सचिव सत्यकुमार सिंह यांनी सांगितले. राज्य शासनाने दृष्टिहीन लोकांसाठी शासकीय सेवांमध्ये ४ टक्के जागा राखीव ठेवाव्या तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये फिजिओथेरपिस्टचे किमान एक पद दृष्टिहीन व्यक्तींमधून भरले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  दृष्टिहीनांना सहानुभूती नको तर समान संधी हवी आहे असे त्यांनी सांगितले.

    संस्थेचे अध्यक्ष हेमंत टकले, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन व सीपीएल ऍरोमाजचे महाव्यवस्थापक रणजित अग्रवाल यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या कार्यकारी संचालक पल्लवी कदम यांनी सूत्र संचालन केले तर कौशल मिश्र यांनी आभार व्यक्त केले.

    यावेळी अमृता प्रदीप शिगवण, ऐश्वर्या नारायण ममदे, विद्या बाबुलाल प्रजापती,  सिंधू प्रभाकर कल्लाट, रोहीत अशोक विश्वकर्मा,  राज प्रकाश मकवाना, रितीक प्रवीण वैष्णव, प्रमोद सुभाष पवार, माझ अहमद अन्सारी,  ओंकार रवींद्र कुल्ये, कौशिक गणेश रावराणे, प्रशांत सदानंद विणेरकर, हर्षवर्धन पांडुरंग हंबीर, अनिल पाटील मयूर, सुमित नामदेव मानकर, फैसल मेहमूद मसानिया व  प्रिती किशोर  राऊत या विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

No comments