विधान भवनात श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण ; नागरिकांनी निर्णयांचे पालन करीत कोरोनावरील विजय सुनिश्चित करावा
स्वातंत्र्यदिनी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जनतेला उद्देशून केलेले भाषण
मित्रहो,
आज आपण भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा करीत आहोत. आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी पर्वास प्रारंभ होत आहे आणि आपण सर्वजण देशाच्या वाटचालीतील या ऐतिहासिक टप्प्याचे साक्षीदार ठरत आहोत याचा अभिमान बाळगू या. परचक्राविरुध्द दिलेला प्रदीर्घ लढा, बलिदान, देशकल्याणाचा अखंड ध्यास आणि त्यानंतर प्राप्त झालेले स्वातंत्र्य, हे स्वराज्य प्राप्त झाल्यावर त्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी सर्वांनी दिलेले योगदान असा मोठ्या कालखंडाचा पट आज आपल्या डोळ्यासमोर उभा आहे. संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि त्याद्वारे सर्वांचा विकास या उद्दिष्टापर्यंत पोहचण्याची आपली निरंतर वाटचाल स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात यशस्वीतेचे आणखी उंच शिखर गाठणारी ठरावी अशी शुभकामना मी व्यक्त करतो.
गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोना वैश्विक महामारीचा सामना करीत आहोत. मार्च-एप्रिल, २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उचल खाल्ली आणि पूर्वस्थितीवर हळूहळू येत असलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले. तो अनुभव लक्षात घेता तिसरी लाट येऊ नये यादृष्टीने शासनस्तरावरून योग्य ती काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्राने लसीकरण प्रक्रियेत घेतलेली विक्रमी आघाडी निश्चितच कौतुकास्पद असून यासंदर्भात योगदान देणाऱ्या सर्व क्षेत्रातील कोविड योध्द्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. सर्व नागरिकांनी "ब्रेक-द-चेन" अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचे पालन करीत कोरोनावरील विजय सुनिश्चित करावा असे मी आवाहन करतो. कोरोना काळात मंदावलेले देशाचे आणि मुंबई आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचे अर्थचक्र आता निश्चितच वेग घेईल.
कोरोना महामारीमुळे डिसेंबर, २०२० चे हिवाळी अधिवेशन प्रथेनुसार नागपूर येथे घेता येऊ शकले नाही. कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांमुळे बाधितांची रोजची संख्या पूर्ण नियत्रंणात आल्यास यावर्षीचे डिसेंबर, २०२१ हिवाळी अधिवेशन आपण निश्चितपणे नागपूर येथे घेऊ असा विश्वास मी व्यक्त करतो.
तापमान बदल आणि पर्यावरणाचे बिघडत चाललेले संतुलन ही वैश्विक समस्या देखील दिवसेंदिवस रौद्र स्वरूप धारण करीत आहे. जगातील थंड प्रदेशात यंदाच्या उन्हाळ्यात अचानक आलेली उष्णतेची लाट, युरोपातील अनेक शहरांना बसलेला पुराचा तडाखा, भूस्खलनाच्या वाढत्या घटना, महाडजवळ दरड कोसळून झालेली मोठी दुर्घटना, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील बिकट पूरपरिस्थिती यासर्व घटना म्हणजे याहीपेक्षा आणखी मोठ्या येऊ घातलेल्या संकटांची चाहूल आहे. दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तसेच पूरसंकटात मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रध्दांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त करतो. महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी धावून आलेल्या अनेक स्वयंसेवी आणि सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो. पर्यावरण संतुलन आणि संवर्धन यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. महाराष्ट्र विधानमंडळाने "वातावरणीय बदल संयुक्त तदर्थ समिती" ची स्थापना केली आहे. आता काळाची गरज ओळखून ही समिती नियमित स्वरूपात कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भारताची एकात्मता आणि अखंडता जपणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. भारतीय संघराज्यातील राज्यांचे परस्परांशी संबंध भारतीयत्वाच्या दृढ नात्याने संबध्द असावेत. महाराष्ट्र राज्य स्थापनेला गेल्या वर्षी ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची सोडवणूक आता स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात होईल तसेच भारतीय संघराज्यातील राज्यांमध्ये असलेले विवाद याच वर्षात सामंजस्याने मिटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. भारताच्या सीमांचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सर्व शूरसैनिकांच्याप्रति मी अंत:करणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
टोकियो ऑलिम्पिक मध्ये उत्तम कामगिरी बजाविणाऱ्या सर्व भारतीय क्रीडापटूंचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.
पुढील वर्षी जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू त्यावेळी भारताला सामर्थ्यशाली आणि वैभवशाली बनविण्याचा आपला संकल्प सिध्दीस गेलेला असेल अशी मनोकामना मी आजच्या शुभदिनी व्यक्त करतो आणि नवभारताच्या निर्माणासाठी आपण सर्वांनी कटीबध्द होण्याचे आवाहन करतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

No comments