Breaking News

फलटण रब्बीचा तालुका असूनही खरीपाचा पेरा वाढला : पिके जोमदार

Despite Phaltan being a rabbi's taluka, kharif sowing has increased: crops are vigorous

     प. महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी आणि नद्यांच्या पुराने थैमान घातले असताना फलटण तालुक्यात मात्र अद्याप  वार्षिक सरासरीच्या १०/१२ % इतका पाऊस झाला आहे. मात्र तालुक्यातील शेतीला पाणी पुरवठा करणारी ३/४ धरणे पूर्ण क्षमतेने भरुन जादा पाणी नदी पात्रात सोडण्यात येत असल्याने पाऊस नसला तरी अर्ध्याहुन अधिक तालुका धरणाच्या पाण्याने निर्धास्त झाला आहे, आगामी काळात तालुका १०० % बागायत होणार आहे.
         फलटण तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी आता ६२२.२४ मि. मी. पर्यंत वाढली असून त्यापैकी आतापर्यंत सरासरी १६७.५० मि. मी. पाऊस झाला असल्याचे निदर्शनास आणून देत महसूल मंडळ निहाय झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता तरडगाव आणि राजाळे महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले आहे.
   फलटण ११६.६० मि. मी. आसू १४९ मि. मी. होळ १६९.५० मि. मी. गिरवी २४९ मि. मी. आदर्कि बु|| १९२.८० मि. मी. वाठार निंबाळकर १७८.८० मि. मी. बरड १४८.८० मि. मी. राजाळे २०४.९० मि. मी. तरडगाव १८४.६० मि. मी. याप्रमाणे महसूल मंडळ निहाय पाऊस झाला असल्याचे रणसिंग यांनी सांगितले.
     अर्थात फलटण हा रब्बीचा तालुका असून येथे नेहमी परतीचा मान्सून ऑगस्ट सप्टेंबर मध्ये बरसतो तथापी अलीकडे निसर्ग बदलला असल्याने पाऊस, ऋतुमान आणि खरीप रब्बी हंगामात बदल झाले आहेत. परिणामी आता रब्बी हंगामाच्या फलटण तालुक्यात खरीपाचा पेरा मोठ्या प्रमाणात होत असून पिकेही जोमदार येत असल्याने बळीराजा खरीप/रब्बी हंगामापेक्षा पाण्याची उपलब्धता, हवामान याचा अंदाज घेऊन पिके घेऊ लागला आहे.
     बाजारात चढ्या दराने होत असलेली सोयाबीनची मागणी लक्षात घेऊन केवळ २२२ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना आता तालुक्यात १२२० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून पिक फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेत जोमदार असताना काही ठिकाणी पिवळा मोझ्याक व्हायरस दिसून  येत असल्याने शेतकरी त्याच्या बंदोबस्ताच्या तयारीला लागला असल्याचे, तसेच त्याबाबत कृषी खात्याच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन केले जात असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले.
     मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३४२३ हेक्टर असताना मक्या खालील क्षेत्रात वाढ झाली असून ४४८४.३० हेक्टर क्षेत्रावर मक्याचा पेरा झाला आहे. पीक वाढीच्या व कणसे भरण्याच्या स्थितीत आहे. बाजरी खालील क्षेत्रात मात्र घट झाली असून बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र १४८४३ हेक्टर असताना ११४५२.७० हेक्टर क्षेत्रावर बाजरीचा पेरा झाला असून पिक पोटरीत व फुलोऱ्यात जोमदार असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 
    खरीप ज्वारी सर्वसाधारण क्षेत्र १६१ हेक्टर असले तरी एक गुंठ्यातही अद्याप पेरा झाला नाही, कडधान्य ३३८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असताना प्रत्यक्षात ४१४ हेक्टर वर पेरा झाला आहे. त्यामध्ये तूर ११०, मूग १२०, चवळी ५६, पावटा २०, मटकी २३, घेवडा ५५, वाटाणा २ हेक्टर याप्रमाणे कडधान्याचा पेरा सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी अधिक प्रमाणात झाला आहे.
      गळीत धान्याचे सर्वसाधारण क्षेत्र केवळ ३३८ हेक्टर असताना प्रत्यक्षात १३२७ हेक्टरवर गळीत धान्याचा पेरा झाला असून त्यामध्ये भुईमूग ९४, सूर्यफूल १३, सोयाबीन १२२० हेक्टरवर पेरा झाला आहे.
     नगदी पिकांमध्ये कांदा ३०५ हेक्टर, टोमॅटो ३० हेक्टर, कापूस १६२ हेक्टर, ऊस आडसाली ३२९० हेक्टरवर लागणी झाल्या असून पूर्व हंगामी व सुरु ऊसाच्या लागणी आता सुरु झाल्या आहेत तर सुमारे ९ हजार हेक्टरवर खोडवा उभा आहे. तालुक्यात प्रत्येक हंगामात तुटणाऱ्या ऊसाचे क्षेत्र नेहमी १७ ते १८ हजार हेक्टर असते यावर्षी त्यामध्ये भरीव वाढ झाली आहे मात्र प्रत्यक्ष आकडेवारी अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले आहे.

No comments