पोलीस हवालदार शहीद सचिन सोनवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दुधेबावी - गिरवी रस्त्यावर १०० वृक्षारोपण व नामफलक अनावरण
![]() |
वृक्षारोपण करताना पोलीस निरीक्षक नितीन सावंत. |
दुधेबावी - दुधेबावी गावातील युवकांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून गावातील युवकांनी एकोपा कायम ठेवावा आणि सामाजिक कामामध्ये वृक्षारोपण व संवर्धन यासाठी विशेष मेहनत घ्यावी असे आवाहन करतानाच वृक्षारोपण संवर्धनासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे सदैव सहकार्य करेल याची ग्वाही फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक नितीन सावंत यांनी दिली आहे.
मुंबई पोलीस दलातील हवालदार व दुधेबावी येथील रहिवासी शहीद सचिन सोनवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दुधेबावी - गिरवी रस्त्यावर १०० विविध वृक्ष, वृक्षारोपण व शहीद सचिन सोनवलकर नामफलक अनावरण दुधेबावी ता. फलटण येथे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुधोजी हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य रविंद्र येवले, पोलीस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, सरपंच मधुकर वावरे यांच्यासह दुधेबावी व पंचक्रोशीतील वृक्षप्रेमी नागरिक, तरुण वर्ग उपस्थित होता. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दुधेबावी येथील तरुणांनी भवानीदेवी मंदिर परिसर आणि दुधेबावी - फलटण मुख्य रस्त्यापासून भवानीदेवी मंदिर मार्गावर अगदी घाट पायथ्यापर्यंत गेल्या सुमारे वर्षभरापासून वृक्षारोपण केले असून त्याला नियमीत पाणी घालुन सर्व झाडे उत्तम प्रकारे वाढविली आहेत, आतापर्यंत डोक्यावर घागर घेऊन पाणी घालावे लागले आता संपूर्ण घाटात ठिबक सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने सर्व झाडे जोमदार वाढत आहेत. भवानीदेवी मंदिर परिसर व घाटात सुमारे २ हजारावर विविध वृक्ष लावले असून त्यामध्ये करवंद आणि रुद्राक्ष वृक्षांचा समावेश आहे. तीर्थक्षेत्र 'क' दर्जा लाभलेले भवानीदेवी मंदिर परिसर आगामी काळात विविध वृक्ष विशेषतः फळ व फुल झाडांनी बहरलेला असेल त्यावेळी येथे येणाऱ्या भाविकांचे निश्चित अधिक समाधान होईल. आता घाट पायथ्या पासून मुख्य रस्त्यापर्यंत वृक्षारोपण झाल्याने मुख्य रस्त्यापासून जाणारे प्रवासी निश्चित या तीर्थ क्षेत्राला भेट देवून आनंदी होतील आणि भवानी देवी मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होण्यास वेळ लागणार नाही.
दुधेबावी येथील ग्रामविकास प्रतिष्ठानचे काम उत्कृष्ट असून ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावात नेहमी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात त्यामध्ये गेल्या सुमारे २०/२५ वर्षांपासून नियमीत सुरु असलेल्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचा सिंहाचा वाटा आहे. राज्याच्या विविध भागातील साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, अभिनय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील नामवंतांना येथे आणून त्यांचे विचार ऐकण्याची संधी दुधेबावीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थाना उपलब्ध करुन देण्याचे काम शशिकांत सोनवलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अव्याहत सुरु ठेवले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर यांनी भेट देऊन वृक्षमित्र सचिन सोनवलकर यांचे कार्याचे कौतुक केले.
वृक्षारोपन चळवळीसाठी वृक्षमित्र सचिन सोनवलकर,ॲड. अक्षय सोनवलकर, दुधेबावी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड, साई चांगण, सारंग चागण, कृषी सहाय्यक सुनिल सोनवलकर, जीवन सोनवलकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास दुधेबावी युवक मित्रमंडळाचे पदाधिकारी, वडले, भाडळी, तिरकवाडी, दुधेबावी येथील युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सौ. सोनाली सोनवलकर यांनी केले,
शशिकांत सोनवलकर सूत्रसंचालन आणि कोकिळा चांगण यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
No comments