Breaking News

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार यांचे फलटणमध्ये स्वागत

Chopdar of Palkhi ceremony welcomes in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या चोपदार यांच्या पायी वारीचे दि. १० जुलै रोजी फलटण मध्ये आगमन झाल्यानंतर फलटणच्या  नगराध्यक्षा सौ.निता मिलिंद नेवसे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत  केले. जर पालखी सोहळ्यास अनुमती मिळाली असती तर, आज दि. १२ जुलै रोजी माऊलींचा पालखी सोहळा फलटण मुक्कामी विसावला असता.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा एस. टी. ने थेट पंढरपूरला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार तसेच ह.भ.प. नरहरी महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी पालखीच्या प्रत्येक मुक्कामी एक किलोमीटर पायी वारी करुन पालखी सोहळ्याची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार काल दि.१० जुलै रोजी त्यांचे फलटणमध्ये आगमन झाले होते. त्यांचे आगमन म्हणजे प्रत्यक्ष माऊलींचे आगमन समजून प्रथेप्रमाणे फलटणच्या नगराध्यक्षा सौ.निताताई नेवसे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. 

    यावेळी श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट पंढरपूरच्या सदस्या माधवीताई निगडे, माजी नगरसेवक मिलिंद नेवसे, सुरज नेवसे, विराज खराडे, सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख, ताजुद्दीन बागवान, युवराज शिंदे, मितेश खराडे, जीवन केंजळे, नसीर शिकलगार उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना राजाभाऊ चोपदार यांनी प्रसादाचे वाटप केले.

No comments