Breaking News

तिसऱ्या लाटेची वाट न पाहता लसीकरणासाठी गाव पातळीवर नियोजन करुन जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केले पाहिजे - डॉ. शिवाजीराव गावडे

Without waiting for the third wave, more people should be vaccinated by planning at the village level for vaccination - Dr. Shivajirao Gawde

 फलटण (प्रतिनिधी) - : कोरोना दुसरी लाट संपली आता तिसऱ्या लाटेची भिती घेवून तिची वाट पहात न बसता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिकारार्थ समाजमन तयार करण्याबरोबर आरोग्य यंत्रणा सक्षमपणे उभी केली पाहिजे, कोविड लसीकरणाचे नियोजन करुन उपलब्ध डोसेस मध्ये जास्तीतजास्त लोकांना लसीकरण करण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचा अभ्यास होण्याची गरज डॉ. शिवाजीराव गावडे यांनी व्यक्त केली आहे.

     शासन प्रशासन आज ४५ वर्षावरील तसेच मधुमेह, रक्तदाब वगैरे आजार असणाऱ्या (कोमोर्बिड) तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांना आणि ६०/६५ पेक्षा अधिक वय आहे त्यांना प्राधान्याने लसीकरण करणार आहे, तसेच ज्यांना कोरोना झाला होता परंतू ते बरे होऊन त्यामधून बाहेर पडले आहेत त्यांना आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिक यांना तूर्त लसीकरण केले जाणार नसल्याचे डॉ. गावडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

     शासन प्रशासन स्तरावर झालेल्या या निर्णयानुसार प्रशासनाने ज्यांना प्राधान्याने लसीकरण करावयाचे आहे त्यांच्या गाववार याद्या तयार केल्या आहेत, त्यामध्ये ज्यांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार नाही, कारण त्यांचे वय १८ ते ४४ दरम्यान आहे, त्यापैकी जे गावातील किराणा दुकानदार, दुग्ध व्यवसाईक, फळे भाजीपाला विक्रेते, ट्रक किंवा अन्य सार्वजनिक वाहनावर चालक आहेत अशा लोकांना प्राधान्याने लसीकरण केले पाहिजे कारण त्यांचा सतत लोकांशी संपर्क येत असतो, प्रशासनाने त्यांना टेस्ट करण्यास संगितले असले तरी पॉझिटीव्ह आले तर १४ दिवसानंतर ते पुन्हा लोकसेवेत येणार असल्याने त्यांना प्राधान्याने लसीकरण करुन दोन्ही डोस दिले पाहिजेत अशी अपेक्षा डॉ. गावडे यांनी व्यक्त केली आहे.

     उपलब्ध डोसेस मध्ये हे शक्य होत नसल्याचे दिसते त्यासाठी ज्यांना शक्य आहे त्या कुटुंबाना प्रत्येकी ९०० रुपये देवून खाजगी रुग्णालयात लसीकरणासाठी प्रवृत्त केले पाहिजे, त्यामुळे अशा लोकांची गावपातळीवर सरकारी यंत्रणे कडील लस शिल्लक राहिल ती गावातील प्रधान्यक्रम यादीतील लोकांना देता येईल.

     तिसरी लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण तातडीने होण्याची आवश्यकता असून प्रशासनाने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण तातडीने होण्यासाठी नियोजन व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी याला प्राधान्य देण्याची गरज आहे.

     खाजगी रुग्णालयात लसीकरण आता प्रत्येकी ९०० रुपये द्यावे लागत असल्याने तिकडे फारसे कोणी येणार नाही या विचाराने खाजगी दवाखाने लसीकरण करण्यासाठी पुढे येण्याचा विचार करीत नाहीत, त्यासाठी आगावू पैसे भरुन त्यांच्याकडे नोंदणी करण्याची मोहिमच गावपातळीवर राबवून ज्यांना शक्य आहे त्यांना खाजगी रुग्णालयाकडे पाठवून सवलतीच्या दरातील लस जे ९०० रुपये देवू शकत नाहीत त्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करावे लागतील अशी अपेक्षा डॉ. गावडे यांनी व्यक्त केली आहे.

    ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांनी व ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन आवश्य करावे कारण कोरोना व्हायरसचा नवीन variant  आल्यास त्यांनाही बाधा होऊ शकते. लस मिळाली म्हणून आपणाला कसेही वागता येणार नाही याची नोंद घेऊन प्रत्येकाने वागले पाहिजे अशी अपेक्षा डॉ. गावडे यांनी व्यक्त केली आहे.

   लहान मुलांबाबतही शासनाच्या नियमाप्रमाणे प्रतिबंधात्मक आचरण करणे आवश्यक असल्याचे डॉ. शिवाजी गावडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

No comments