Breaking News

‘मन की बात’ मध्ये प्रवीण जाधव चा गौरवपूर्ण उल्लेख ; राज्यपालांकडून पंतप्रधानांचे आभार

Praveen Jadhav's glorious mention in 'Mann Ki Baat'; Thanks to the Prime Minister from the Governor

    मुंबई, दि.27 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रवीण जाधव या धनुर्विद्या क्रीडापटूचा गौरवपूर्ण उल्लेख केला, ही राज्याकरिता अभिमानाची बाब आहे.  मा.पंतप्रधान महोदयांचे या गौरवपूर्ण उल्लेखाबाबत मी आभार व्यक्त करतो तसेच संपूर्ण राज्याच्या वतीने प्रवीण जाधवला ऑलिम्पिकमध्ये देदिप्यमान यशासाठी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

आज प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की :

    “मित्रांनो, जेव्हा बुद्धिमत्ता, समर्पण, निश्चय आणि खिलाडू वृत्ती एकत्र येतात, त्यावेळी चॅम्पियन घडत असतात. आपल्या देशातील बहुतांश क्रीडापटू लहान गाव किंवा छोट्या शहरांमधून येतात. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या आपल्या पथकामध्ये देखील अश्या अनेक प्रेरणादायी खेळाडूंचा समावेश आहे. प्रवीण जाधव यांच्याबद्दल ऐकल्यावर तुम्हालादेखील तसेच वाटेल. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवीणने किती तरी अडी-अडचणींचा सामना केला आहे. प्रवीण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील आहे. तो धनुर्विद्येत फार चांगली कामगिरी करतोय. त्याचे आई वडील उपजीविकेसाठी रोजंदारीवर काम करीत आहेत, आणि त्यांचा मुलगा आपल्या पहिल्या वाहिल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी टोकियो येथे जात आहे.  ही केवळ त्याच्या पालकांकरिताच नव्हे, तर आपण सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे”.

    मा.पंतप्रधान महोदयांचे या गौरवपूर्ण उल्लेखाबाबत मी आभार व्यक्त करतो तसेच संपूर्ण राज्याच्या वतीने प्रवीण जाधवला ऑलिम्पिकमध्ये देदिप्यमान यशासाठी शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

No comments