Breaking News

प्रविण जाधव ची ऑलिम्पिकसाठी निवड झाली हे महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी अभिमानास्पद - क्रिडाउपसंचालक युवराज नाईक

It is a matter of pride not only for Maharashtra but also for the country that Pravin Jadhav was selected for the Olympics - Sports Director Yuvraj Naik

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सरडे सारख्या ग्रामीण भागातील प्रविण जाधव या खेळाडूने धनुर्विद्या क्रिडा प्रकारात जपान येथे होणाऱ्या आँलंपिक स्पर्धेसाठी निवड झाली हे महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे क्रिडाउपसंचालक युवराज नाईक यांनी केले.

    सरडे ता. फलटण येथील प्रवीण रमेश जाधव या खेळाडूची जपान येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात निवड झाल्याबद्दल आज क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी प्रवीण जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन, प्रवीणच्या आई-वडिलांचा सत्कार केला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका  क्रीडा अधिकारी महेश खुटाळे,  क्रिडा अधिकारी सुनिल कोळी, क्रीडा मार्गदर्शक संभाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

    अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रविण ने खेळाची आवड जपत  त्याने आपल्या जिद्द व मेहनतीने हे यश मिळविले आहे, त्याला तत्कालीन क्रीडा शिक्षक विकास भुजबळ यांनी केलेले मार्गदर्शन व आईवडीलांनी केलेला त्याग हे त्याला निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे. आज सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी तो निश्चित करेल असा विश्वास व्यक्त नाईक यांनी केला.
    युवकांनी जास्तीत जास्त खेळाकडे लक्ष दिले पाहिजे सरडे गावात प्रविण बरोबरच दहा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत, हि गोष्ट अत्यंत चांगली आहे, त्यामुळे सरडे गावाने  खेळाडू निर्मिती साठी जास्तीत जास्त क्रीडा योजनांचा लाभ घ्यावा, त्यासाठी आपण विशेष बाब व प्रविण चे गाव म्हणून मागेल एवढा निधी देऊ असे आश्वासन नाईक यांनी यावेळी दिले.

    फलटण तालुक्यातील खेळाडूंसाठी प्रविण जाधव आयडॉल आहे. त्याचा सारख्या खेळाडू ची गरज देशाला आहे. त्यांच्या आईवडीलांनी केलेले कष्ट खरोखरच नवीन पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडल्या जातील असे तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी स्पष्ट केले.

    प्रारंभी प्रविण जाधव यांच्या आईवडीलांचा यथोचित सत्कार क्रिडाउपसंचालक नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच दत्ता भोसले, रामदास शेंडगे, क्रिडाशिक्षक आप्पासाहेब वाघमोडे, उपसरपंच महादेव विरकर, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, बापूराव शेंडगे, शरद भंडलकर, आण्णा भंडलकर, संतोष भोसले, पूजा शेंडगे, ऐश्वर्या बेलदार  यांच्या सह खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments