Breaking News

फलटण - लोणंद- पुणे रेल्वे सेवा 30 जून पर्यंत बंद

फलटण लोणंद पुणे रेल्वे - संग्रहीत छायाचित्र 
Phaltan-Lonand-Pune train service closed till June 30

    फलटण -  फलटण - लोणंद - पुणे या रेल्वेमार्गावरील रेल्वे सेवा थांबविण्यात आली आहे. गेला महिनाभर ही गाडी प्रवाशांवीना धावल्याने व या मार्गावरील रेल्वे लाईनचे काम सुरु असल्याने शुक्रवार दि. ७ मे पासून ही रेल्वे बंद करण्यात आली असून, बुधवार दि. ३० जून अखेर ही रेल्वे गाडी बंद ठेवण्यात येणार आहे.

     मंगळवार दि. ३० मार्च रोजी फलटण लोणंद पुणे या रेल्वे सेवेचा प्रारंभ दिल्ली येथून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, मुंबई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते अॉनलाईन हिरवा झेंडा दाखवून तर फलटण रेल्वे स्थानकामधून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार छ. उदयनराजे भोसले, मंडल रेल प्रबंधक सौ. रेणू शर्मा, अतिरीक्त महाप्रबंधक बी. के. दादाभाई, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनिल मिश्रा, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळूंखे-पाटील, श्रीमती मंदाकीनी नाईक निंबाळकर, ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला होता.  

        फलटण लोणंद पुणे या रेल्वे गाडीमुळे फलटण शहर व तालुका थेट पुण्याशी जोडले गेले होते. त्यामुळे त्याचा फायदा येथील शेतकरी, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी या सर्वांना होणार असला तरी, कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. रुग्णांमध्येही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउन मुळे गेल्या महिनाभरापासून ही गाडी प्रवाशांवीना रिकामीच धावत होती. गाडी रिकामीच धावत असल्याने तसेच या मार्गावर रेल्वे लाईनचे काम सुरु असल्याच्या कारणावरुन शुक्रवार दि. ७ मे पासून ही रेल्वे सेवा थांबविण्यात आली आहे. सदर रेल्वे ही ३० जून २०२१ अखेर बंदच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जर पुण्याला जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना आता लोणंद रेल्वे स्थानक गाठावे लागणार आहे. मात्र रेल्वे प्रवासासाठी फलटण प्रांत कार्यालयातून प्रवाशांना क्यूआर कोड अधारीत ओळखपत्र किंवा पास काढावा लागणार आहे. अन्यथा त्या शिवाय कुणालाही रेल्वे प्रवास करता येणार नाही.

No comments