Breaking News

उपेक्षितांसाठी कार्य केले तरच विद्यापीठाची दीक्षा सार्थकी ठरेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Governor Koshyari presides over 29th Convocation of North Maharashtra University

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९वा दीक्षांत समारंभ संपन्न

    मुंबई - : कोरोनाचे संकट अचानक नाहीसे होणारे नसून आपल्याला त्यासोबत जगायला शिकावे लागणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून पुढे कदाचित यापेक्षा कठीण परिस्थिती येईल. ही महामारी थांबवायची असेल तर प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक आहे. या संदर्भात विद्यापीठांनी तसेच विद्यार्थ्यांनी समाजात व्यापक जनजागृती केली आणि पुरेशी खबरदारी घेतली, तर कोरोनाच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देता येईल. या कठीण प्रसंगी समाजातील गरजू आणि उपेक्षित लोकांसाठी काम केले तरच विद्यापीठातील दीक्षा सार्थकी ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत आज संपन्न झाला. त्यावेळी राजभवन येथून सहभागी होताना राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन प्रामुख्याने उपस्थित होते.

शिक्षण म्हणजे केवळ पदवी प्राप्त करणे नसून शिक्षण हे मनुष्यामध्ये अगोदरच असलेले पूर्णत्व प्रकट करण्याचे साधन असल्याचे सांगून प्रत्येकाने आपल्यातील सद्गुणांचा विकास करून चांगले मनुष्य झाले पाहिजे, असे राज्यपालांनी आपल्या दीक्षांत भाषणात सांगितले.

बहिणाबाई चौधरी स्वतः फारश्या शिकलेल्या नसून देखील त्यांनी सांगितलेले जीवनाचे सार अलौकिक असल्याचे सांगताना राज्यपालांनी बहिणाबाई यांची ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर’ ही ओवी उधृत केली. विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही होऊन नवनवीन संशोधन केले पाहिजे, तसेच शिक्षकांनी पारखी होऊन विद्यार्थी घडविले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी स्नातकांना सत्य बोलण्याचा, सत्याचरण करण्याचा तसेच आपल्या आचार विचारातून कोणासही मानसिक वा कायिक दुःख होणार नाहे याची दक्षता घेण्याचा सल्ला दिला.

‘प्रत्येक विद्यापीठात साहित्य महोत्सव व्हावा’ : उदय सामंत

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शिक्षण साहित्य परंपरा जोपासल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना साहित्य संस्कृती जतन करण्यासाठी दरवर्षी प्रत्येक विद्यापीठामध्ये साहित्य महोत्सव झाला पाहिजे तसेच सर्व विद्यापीठांचा मिळून एक सामायिक साहित्य महोत्सव झाला पाहिजे, अशी अपेक्षा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यातील विद्यापीठे ‘तंबाखू मुक्त, व्यसनमुक्त तसेच छेडछाड मुक्त’ करण्याची संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षांत समारोहात ४९७५३ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, तर २६१ उमेदवारांना पीएच.डी. व ९९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

प्रातिनिधिक स्वरुपात अविनाश नरेश पाटील या विद्यार्थ्याला कुलपतींचे सुवर्ण प्रदक प्रदान करण्यात आले, तर अदनान अहमद शेख व गायत्री संजय बारी यांना सुवर्णपदक देण्यात आले. कुलगुरू वायुनंदन यांनी विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन केले.

No comments