Breaking News

एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण

Vaccination of 4 lakh 62 thousand citizens on the same day

    मुंबई, दि. ४ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकीत महाराष्ट्राने आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांचे लसीकरण करून देशात अग्रभागी राहण्यात सातत्य राखले आहे.

    कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे काल महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

    राज्यात दि. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. काल दि. ३ एप्रिल रोजी राज्यभर ४१०२ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार करीत ४ लाख ६२ हजार जणांना लस देण्यात आली. काल देखील पुणे जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ७६ हजार ५९४ जणांना लसीकरण करून राज्यात अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (४६ हजार ९३७), नागपूर (४१ हजार ५५६), ठाणे (३३ हजार ४९०) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

No comments