Breaking News

मार्च 2021 मधील जीएसटी महसूल संकलनाने नवा विक्रम नोंदवला

GST revenue collection in March 2021 set a new record

    नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021 - मार्च  2021 या  महिन्यात एकूण 1,23,902 कोटी रुपये इतका विक्रमी जीएसटी महसूल संकलित करण्यात आला आहे, त्यापैकी सीजीएसटी  22,973 कोटी रुपये आहे, एसजीएसटी 29,329  कोटी रुपये, आयजीएसटी  62,842 कोटी रुपये आहे (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या,31,097 कोटी रुपयांसह) आणि अधिभार  8,757  कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित  935 कोटी रुपयांसह) आहे.

    सरकारने नियमित तडजोड  म्हणून आयजीएसटीमधून 21,879  कोटी रुपये सीजीएसटीला आणि   17,230  कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. या व्यतिरिक्त, केंद्र व राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांच्यातील 50:50 गुणोत्तरानुसार आयजीएसटीतील तात्पुरती तडजोड  म्हणून केंद्र सरकारने 28,000 कोटी रुपये दिले आहेत. मार्च   2021 महिन्यात नियमित निपटाऱ्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळविलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी, 58,852 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी  60,559 कोटी रुपये आहे. मार्च 2021 मध्ये केंद्र सरकारने  30,000 कोटीची भरपाई देखील जारी केली आहे.

    जीएसटी सुरु झाल्यापासून मार्च   2021 महिन्यात जीएसटी महसुल आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे. गेल्या पाच महिन्यात जीएसटी महसुलात सुधारणा दिसत असून मार्च 2021 महिन्यातील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसूलपेक्षा 27  टक्के  जास्त आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल गेल्या वर्षीपेक्षा 70% जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल 17% जास्त होता.

    या आर्थिक वर्षाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत जीएसटीच्या महसुलात  अनुक्रमे (-) 41%, (-) 8%, 8% आणि 14% वाढ झाली असून  जीएसटी महसूल तसेच संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सुधारणेचा  कल स्पष्टपणे दाखवत आहे.

    जीएसटी महसुलाने सलग सहाव्या महिन्यात 1 लाख कोटींचा आकडा पार केला आहे. अर्थव्यवस्थेत पुन्हा उभारीचे हे लक्षण असून कर प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांचा हा परिणाम आहे. जीएसटी, आयकर आणि सीमाशुल्क आयटी प्रणाली आणि प्रभावी कर प्रशासनासह बहुविध स्त्रोतांमधील डेटा विश्लेषण आणि बनावट-बिलिंगवर देखरेख तसेच प्रभावी कर प्रशासनानेही गेल्या काही महिन्यांपासून करांच्या महसुलातील स्थिर वाढीमध्ये योगदान दिले आहे.

No comments