कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी ताकदीबरोबर बुद्धिकौशल्य, शिस्त व शांत डोक्याची आवश्यकता - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळक
![]() |
जुन्या आठवणींना उजाळा देत भेटीदाखल दिलेली फोटो फ्रेम स्वीकारताना श्रीमंत संजीवराजे व विश्वजीतराजे. (छाया योगायोग फोटो) |
फलटण दि. २७ : कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी ताकदीबरोबर बुद्धिकौशल्य, शिस्त व शांत डोक्याची अत्यंत गरज असून त्याद्वारे कुस्तीमध्ये विजयश्री प्राप्त करता येते याची ग्वाही देत अनेक नामवंत पैलवान बुद्धी कौशल्याच्या व्यवसायात नामवंत आहेत, एक दंतरोग तज्ञ पूर्वी नामवंत पैलवान होते अशी माहिती देत मल्ल विद्येत बुद्धिकौशल्याशिवाय यशस्वी होता येणार नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
संस्थानकालीन शुक्रवार तालीम इमारत विस्तार, जुन्या इमारतीची दुरुस्ती, अन्य विकास कामासाठी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगती जगन्नाथ कापसे यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिलेल्या १५ लाख रुपयांच्या निधीतील विकास कामांचा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून समारंभपूर्वक करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते.
![]() |
विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलताना श्रीमंत संजीवराजे समोर उपस्थित पैलवान व अन्य मान्यवर |
श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या अगोदर संस्थान काळापासून शुक्रवार पेठ तालमीने कुस्ती व अन्य खेळांची परंपरा जपली असून येथून उत्तम पैलवानांप्रमाणे उत्तम कब्बडी पटू निर्माण झाल्याची माहिती देत या तालमीत हिंदकेसरी पै. मारुती माने, श्रीरंग पैलवान यांनी कुस्तीचे धडे दिले आहेत याची आठवण देत आपल्याकडे मातीवरील कुस्तीमध्ये अनेकांनी प्राविण्य मिळविले आहे तथापी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये मॅटवरील कुस्तीला प्राधान्य दिले जात असल्याने त्या प्रकारचे शिक्षणही येथे दिले गेले पाहिजे अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
पट्टीचे, तरबेज पैलवान असलेल्या पै. खाशाबा जाधव यांना राष्ट्रीय स्पर्धेत ब्रान्झ पदकावर समाधान मानावे लागले, तसेच पै. मारुती माने यांनी एकाचवेळी मातीवरील व मॅटवरील कुस्ती खेळली त्यामध्ये मातीवरील कुस्तीमध्ये त्यांना सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले मात्र मॅटवरील कुस्तीमध्ये त्यांना ताम्रपदकावर समाधान मानावे लागल्याची आठवण देत येथे दोन्ही प्रकारच्या कुस्ती प्रकारात प्रशिक्षण देण्याची आवश्यकता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
अलिकडे मानवी आरोग्य अत्यंत चिंताजनक झाले असल्याने प्रत्येकाने आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत लहान वयात गंभीर आजार होत असल्याने कुस्ती मध्ये सर्वांनाच प्राविण्य मिळविता आले नाही तरी कुस्तीमधील व्यायाम, मेहनत, शिस्त, आहार यामुळे आरोग्य निरोगी ठेवून शरीर प्रकृती उत्तम राखणे शक्य असल्याने लहान वयापासून तालमीतील व्यायाम उत्तम व्यायाम असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, सुदामराव मांढरे, चंद्रकांत शिंदे, संजय पालकर, राहुलभैय्या निंबाळकर, फिरोज आतार, बॉडी बिल्डर अमीर सय्यद, आबा बेंद्रे, महंमद शेख, चंद्रकांत पालकर, ताजुद्दीन शेख, गणेश पालकर, बंटी गायकवाड, सनी शिंदे, पप्पू शेख, अभिजीत जानकर, राहुल निंबाळकर, यांच्या सह तालमीतील ७०/८० पैलवान, शुक्रवार पेठेतील कुस्ती प्रेमी नागरिक उपस्थित होते.
No comments